नितीन भुतडा यांना २० कोटीचा गंडा घालण्याचा प्रयत्न, आरोपीवर गुन्हा दाखल
केंद्रीय महामंडळावर नियुक्तीचे दिले होते आमिष

उमरखेड
के द्र सरकारच्या विविध महामंडळांवर अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्ती करून थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळवून देण्याचे अमिश देत तब्बल २० कोटी रुपयाचा गंडा घालण्याचा आरोपींचा कट फसला. या प्रकरणी तिघावर गुन्हा दाखल होताच जिल्हयाभरात खळबळ उडाली. ही घटना ३० मे रोजी माजी आमदार मदन येरावार यांच्या कार्यालयत उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे जिल्हा समन्वयक यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आरोपींनी काही दिवसापूर्वी भुतडा यांच्याशी संपर्क साधला होता. आरोपींनी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ४२ महामंडळांची अधिकृत वाटणारी यादी, त्यांचे कोट्यवधींचे बजेट आणि मिळणाऱ्या उच्चपदस्थ सुविधांची माहिती पाठवली. या यादीपैकी कोणत्याही तीन महामंडळांवर नियुक्ती करण्यासाठी २० कोटी ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच कामासाठी ५ टक्के ‘टोकन रक्कम’ आगाऊ देऊन दिल्लीत पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी आरोपी गणेश राठोड आणि विश्वजित राठोड या दोघांनी भुतडा यांची भेट ही घेतली होती. दरम्यान भुतडा यांना शंका आल्याने त्यांनी आरोपींना रंगेहात पकडण्याचा निर्णय घेतला व माजी आमदार मदन येरावार यांच्या संपर्क कार्यालयात गुप्त कॅमेरे बसवले. ३० मे रोजी टोकन रक्कम देण्यासाठी आरोपींना बोलावण्यात आले. भुतडा यांनी एका बॅगेत रद्दी भरली आणि त्यावर केवळ ५० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा ठेवल्या. ठरल्याप्रमाणे आरोपींनी पैशांची बॅग स्वीकारताच त्यांचे सर्व कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले.
या प्रकरणी यवतमाळ पोलिसात जगन्नाथ फुलकर सह तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला.




