जिल्ह्यात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांची कडक अंमलबजावणी; उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

बुलडाणा,
पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व प्लास्टिकमुक्त जिल्ह्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्ह्यात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी दिले आहेत. या संदर्भातील परिपत्रक जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले आहे. हे परिरत्रक ६ जुलै रोजी पाठवण्यात आले आहे.
या परिपत्रकानुसार, सर्वच पंचायत समितींना प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६ चे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध संबंधित नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आणि संबंधित यंत्रणांनी एकेरी वापरातील (सिंगल-यूज) प्लास्टिकवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, प्लास्टिक कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण, संकलन, पुनर्वापर आणि शास्त्रोक्त विल्हेवाट यावर विशेष भर द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, नागरिकांमध्ये प्लास्टिकमुक्त जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम, मोहिमा आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या अभियानासाठी सर्व गटविकास अधिकारी, ग्रामपंचायती तसेच संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे व बुलडाणा जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.
अशी राहणार ग्रामपंचायतींची जवाबदारी
प्लास्टिकमुक्त व स्वच्छ गाव घडविण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्लास्टिक कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण, संकलन, साठवणूक व वाहतूक प्रभावीपणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. पुनर्वापरयोग्य प्लास्टिक अधिकृत प्रक्रिया केंद्रांकडे पाठविण्याची व्यवस्था करावी. ग्रामस्थ, शाळा, महिला बचत गट आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्तीबाबत सातत्याने जनजागृती करावी. प्लास्टिक कचरा उघड्यावर जाळला जाणार नाही, तसेच तो रस्ते, नाले किंवा जलस्त्रोतांमध्ये टाकला जाणार नाही यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ग्रामीण भागात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा उभारून त्या नियमितपणे कार्यान्वित ठेवाव्यात. जत्रा, उत्सव, विवाह समारंभ व धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याची जबाबदारी स्वीकारणे बंधनकारक राहील. आठवडी बाजारांमध्ये व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन द्यावे. स्वच्छता कराची प्रभावी वसुली, शाळकरी विद्यार्थ्यांचा स्वच्छता मोहिमांमध्ये सहभाग, “प्लास्टिकमुक्त सुंदर गाव, हेच आमचे नाव” अशा संदेशांचे माहिती फलक लावून जनजागृती करणे आणि प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करणे, या जबाबदाऱ्याही ग्रामपंचायतींनी काटेकोरपणे पार पाडाण्याचे आदेश देण्यात आले आहे.
प्लास्टिक नियमांचे उल्लंघन केल्यास असा होईल दंड
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा फेकणाऱ्यांकडून १०० ते ५०० रुपये, तर प्लास्टिक कचरा उघड्यावर जाळणाऱ्यांकडून ५०० ते २,००० रुपये दंड वसूल करण्यात येईल. अनधिकृत ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकल्यास ५०० ते ५,००० रुपये दंड आकारला जाईल. बंदी घालण्यात आलेल्या एकेरी वापराच्या (सिंगल-यूज) प्लास्टिक वस्तूंचा वापर, साठा किंवा विक्री करणाऱ्यांवर १,००० ते ५,००० रुपये दंडाची तरतूद असून, त्याच प्रकारचा नियमभंग पुन्हा झाल्यास दंडाची रक्कम दुप्पट करण्यात येईल. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर २५ हजार रुपयांपर्यंत दंड आणि तीन महिन्यांपर्यंत कारावासाची कारवाईही होऊ शकते.
जिल्हा प्लास्टीक मुक्त करावा
“प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन करून जिल्हा लवकरात लवकर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावे.
सतीश देशमुख
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता)




