चिखलीत धान्य व्यवहारातून व्यापाऱ्याची तब्बल ६६ लाखाची फसवणूक
अकोला येथील व्यापाऱ्याने घातला गंडा

बुलडाणा | प्रतिनिधी
धान्य खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून विश्वास संपादन करून एका व्यापाऱ्याची तब्बल ६६ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चिखली एमआयडीसी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनुप अशोक अग्रवाल (वय ३९, रा. एमआयडीसी चिखली) हे ‘महाराजा अग्रसेन ट्रेडिंग कंपनी’ या नावाने व्यवसाय करतात. त्यांचा अकोला येथील अभिजीत मुरारका यांच्यात मागील काही वर्षांपासून धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते. सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये सर्व काही सुरळीत पार पडल्याने अग्रवाल यांचा मुथा यांच्यावर विश्वास बसला. दरम्यान ६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अभिजीत मुरारका यांनी स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर चणा खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. ही संधी असल्याचे सांगत अग्रवाल यांना व्यवहारासाठी तयार केले. त्यासाठी त्यांनी तातडीने पैसे पाठवण्याची विनंती केली. विश्वासातून अग्रवाल यांनी प्रथम सुमारे २३ लाख रुपये त्यांच्या खात्यावर पाठवले. या सर्व व्यवहारासाठी मुरारका यांनी व्हॉट्सअॅपवर रिया ट्रेडींग कंपनीकडून खरेदी केलेल्या ३०३ क्विंटल व २७७ क्विंटलची बिले पाठवून व्यवहाराची खात्री दिली. दरम्यान, खरेदी केलेला माल हा रुषभ ट्रेडींग कंपनीला विकायचा आहे व त्याचे पेमेंट पुढील ते २० दिवसांत मिळतील, असे आश्वासन आरोपीकडून देण्यात आले. त्यानंतर पुन्हा दोनच दिवसात आरोपीकडून ८० क्विंटल चणा आणखी विक्रीस आलेला असल्याची माहिती देत हा खरेदीसाठी ३५ लाख ७० हजार रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग करण्यास आरोपीने सांगितले. त्यावर सदर रक्कम आरोपीच्या खात्यात टाकले व सदर बील मला टाकण्याचे सांगितले असता आरोपीने उद्या सुटटी असल्याने परवाला बील टाकण्याचे आश्वासन दिले. सदर बील मिळाले नसल्याने तक्रारदार यास पुन्हा दोन दिवसानंतर फोन केला असता आरोपीच्या पत्नी अनीता मुरारका यांनी फोन घेत अभिजीत आजारी असून दवाखाण्यात भरती असल्याची माहिती दिली. त्यानंतर पुन्हा संपर्क केला असता आरोपीने सांगितले की, समोरची पार्टी पैसे देत नाही, तुम्हाला विश्वास नसेल तर मी माझा चेक देतो तो तुम्ही बँकेत लावा असे सांगितले. दरम्यान वारंवार पैशाची मागणी करुन ही मुरारका यांनी पैसे दिले नाही. शेवटी मुरारका यांनी दिलेले चेक बँकेत वटवण्यासाठी टाकले असता खात्यात पैसेच नसल्याची माहिती समोर आली.
पैसे परत मिळत नसल्याने आणि संपर्क टाळला जात असल्याने अग्रवाल यांनी अकोला पोलिसात या बाबत चौकशी केली असता, अभिजीत मुरारका व त्यांच्या पत्नी अनीता मुरारका यांच्या नावाने व्यवहार करणाऱ्या कंपन्या त्यांच्याच असल्याची माहिती समोर आली. तसेच या दोघांविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली.
यानंतर अग्रवाल यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अभिजीत मुरारका व अनिता मुरारका यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीनसिंग चौहान करत आहेत.




