आदिशक्ती अभियानात सिंदखेडचा झेंडा; तालुक्यात प्रथम पुरस्कार
महिला सक्षमीकरण व विकासाभिमुख उपक्रमांची दखल; ग्रामपंचायतीच्या कार्याला शासनाचा सन्मान

एस. बी. शेख
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे सन २०२५-२६ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या **’आदिशक्ती पुरस्कारां’**मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सिंदखेड ग्रामपंचायतीची तालुकास्तरीय प्रथम पुरस्कारासाठी निवड झाली आहे. महिलांचे सक्षमीकरण, बालकांचा सर्वांगीण विकास, अंगणवाडी सेवा बळकटीकरण, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, आरोग्य व पोषण जनजागृती, शिक्षण, स्वच्छता आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
ग्रामपंचायतीने आदिशक्ती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. या यशामागे गटविकास अधिकारी हिवाळे, सहायक सुरोसे, विस्तार अधिकारी काळे, तायडे, धनगर, ग्रामपंचायत सचिव प्रमोद वाघ, उपसरपंच शारदाबाई उजाडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग लाभला.
सिंदखेड ग्रामपंचायतीने यापूर्वीही आयएसओ प्रमाणित ग्रामपंचायत कार्यालय, पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेतील राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात तालुकास्तरीय प्रथम, जलसंवर्धक पुरस्कार, स्मार्ट ग्राम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील यश, ‘माझी वसुंधरा’ अभियानातील विभागस्तरीय प्रथम व सलग दोन वर्षे राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक, फार्मर कप विजेतेपद, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत पंचायत लर्निंग सेंटर तसेच ‘नमो आत्मनिर्भर व सौरऊर्जा गाव अभियान’ आदी अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत.
याबाबत सरपंच प्रवीण (आप्पा) कदम यांनी सांगितले की, “आदिशक्ती अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा हा सन्मान आहे. हा पुरस्कार संपूर्ण सिंदखेड ग्रामस्थांचा असून ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे. भविष्यातही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि विकासाभिमुख उपक्रमांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा आमचा निर्धार कायम राहील.”




