धामणगावबढे तील वीजपुरवठ्याचा लपंडाव; नागरिकांचा संताप
वारंवार डीपी जळणे, कमी दाबाचा वीजपुरवठा अन् रात्री दुरुस्तीला विलंब; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

धामणगाव बढे | सादिक बिस्मिल्लाह शेख
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार वीज खंडित होणे, विद्युत डीपी जळणे, कमी व्होल्टेज तसेच अनियमित वीजपुरवठ्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. तक्रारी करूनही समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. गणेशोत्सवाच्या काळातही सायंकाळच्या आरती व धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर विद्यार्थी, दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांनाही वारंवार वीज जाण्याचा फटका बसत आहे.
डीपी जळण्याचे सत्र कायम
गावातील विविध भागांत वारंवार डीपी जळण्याच्या घटना घडत असून, काही ठिकाणी कमी दाबाचा वीजपुरवठा ही नियमित समस्या झाली आहे. कमी व्होल्टेजमुळे घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता वीज वितरण यंत्रणेची क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रात्री बिघाड झाल्यास दुरुस्तीला विलंब
धामणगाव बढे हे मोठे गाव असूनही महावितरणचा कर्मचारी कायमस्वरूपी मुख्यालयी उपलब्ध नसल्याने रात्रीच्या वेळी वीजपुरवठ्यात बिघाड झाल्यास अडचणी वाढतात. डीपी किंवा अन्य यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर तातडीने दुरुस्ती न झाल्यास नागरिकांना बराच काळ अंधारात राहावे लागते. त्यामुळे गावाच्या लोकसंख्येचा विचार करून कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्येवर तात्पुरत्या दुरुस्त्यांऐवजी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार जळणाऱ्या डीपीची क्षमता वाढविणे, कमी व्होल्टेजची समस्या दूर करणे, नियमित वीजपुरवठा करणे आणि रात्रीच्या वेळी तातडीच्या दुरुस्तीसाठी कर्मचारी उपलब्ध करून देणे, या उपाययोजनांकडे नागरिकांचे लक्ष आहे.




