लोणार विज्ञान महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना
अग्निसुरक्षेचे प्रात्यक्षिक; ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’अंतर्गत विद्यार्थ्यांची सामूहिक शपथ

लोणार
राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली. यावेळी लोणार नगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सामूहिक नशामुक्तीची शपथ देण्यात आली.
अमृत सेवाभावी संस्था, परभणी संचालित विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, कै. कमलाबाई बनमेरू महिला महाविद्यालय आणि लोणार नगरपालिका अग्निशमन दल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू होते. प्रमुख अतिथी म्हणून अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष बनमेरू उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय समन्वयक डॉ. कमलाकर वाव्हळ यांचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. वाव्हळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वयंसेवाभाव, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित करणे हा राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश असल्याचे सांगितले. ‘Not Me But You’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आगीच्या प्रसंगी काय करावे?
लोणार नगरपालिका अग्निशमन दलाचे फायरमन प्रभू उत्तम सानप व अशोक अर्जुन मादनकर यांनी विद्यार्थ्यांना आग लागण्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती दिली. अग्निशामक यंत्राचा योग्य वापर, आग विझविण्याची पद्धत तसेच संकटाच्या वेळी सुरक्षितरीत्या बाहेर पडण्याचे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले.
आग लागल्यास घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे, स्वतःसह इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि गरजेनुसार तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र भिसे यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व जबाबदार जीवन जगावे आणि विकसित भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी NSS गीत व NSS Clap घेण्यात आले.
महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कक्ष विद्यार्थ्यांना आपत्तीपूर्व तयारी, आपत्कालीन उपाययोजना आणि बचावकार्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत राहणार आहे. या माध्यमातून भविष्यात अग्निसुरक्षा प्रात्यक्षिके, प्राथमिक उपचार प्रशिक्षण आणि विविध जनजागृतीपर उपक्रम घेण्यात येणार आहेत.
‘Not Me But You’चा संदेश
राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त विद्यार्थ्यांना केवळ दिनाचे महत्त्व सांगण्यापुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता सेवा, स्वयंसेवाभाव आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. समाजासाठी योगदान देण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यावर यावेळी भर देण्यात आला.
आपत्ती कक्षात नियमित प्रशिक्षण
नव्याने स्थापन झालेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून महाविद्यालयात वेळोवेळी अग्निसुरक्षा, प्राथमिक उपचार, आपत्तीपूर्व तयारी आणि आपत्कालीन बचावकार्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे आपत्तीच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने प्रतिसाद देता यावा, हा या कक्षामागील उद्देश आहे.




