१४ वर्षांच्या सेवाकार्याची दखल; सुरज यादव यांचा जिल्हास्तरीय सन्मान
गौसेवा, रक्तदान आणि रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजात निर्माण केली वेगळी ओळख

खामगाव
कोणत्याही राजकीय अपेक्षेशिवाय समाजसेवेचा वसा जपत गेल्या १४ वर्षांपासून विविध सेवाकार्यांत योगदान देणारे सुरज यादव यांचा जिल्हास्तरीय सन्मान करण्यात आला. गौसेवा, रक्तसेवा, रुग्णसेवा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची दखल या सन्मान सोहळ्यात घेण्यात आली.
आसलगाव, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहात ८ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कार्यशाळा व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरज यादव यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गौरविण्यात आले. यादव हे एकनिष्ठा गौसेवा रक्तसेवा फाउंडेशनचे संस्थापक असून, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रक्तमित्र आणि गौसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. प्राणीमात्रांची सेवा, गरजू रुग्णांना मदत आणि रक्तसेवेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजू घाटे (पाटील) यांनी यादव यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रसिद्धीपेक्षा प्राणीमात्रांच्या वेदना आणि गरजूंच्या अडचणींना प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी सुरजभैय्या यादव यांच्या सेवाकार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमाला तहसीलदार पवन पाटील, कृषी अधिकारी रमेश जाधव, गटविकास अधिकारी सुधाकर वायाळ यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.




