आदिवासी धर्माच्या स्वतंत्र नोंदणीसाठी टिटवीतून आवाज
चौथ्या आदिवासी धर्म चिंतन परिषदेत जनजागृतीचा निर्धार; आगामी जनगणनेत स्वतंत्र नोंदीचे शिवाजीराव मोघे यांचे आवाहन

लोणार
आदिवासी समाजाची स्वतंत्र धार्मिक ओळख शासकीय नोंदीत प्रतिबिंबित व्हावी, या मागणीला टिटवी येथे झालेल्या चौथ्या आदिवासी धर्म चिंतन परिषदेतून पुन्हा एकदा वाचा फोडण्यात आली. आगामी जनगणनेत धर्माच्या नोंदीमध्ये ‘आदिवासी धर्म’ असा उल्लेख करण्यासाठी समाजबांधवांनी जनजागृती करावी, असे आवाहन माजी मंत्री तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी केले. या परिषदेत आदिवासी समाजाची धार्मिक ओळख, सांस्कृतिक परंपरा, घटनात्मक अधिकार आणि सामाजिक एकात्मता या विषयांवर विचारमंथन करण्यात आले.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव मोघे होते, तर बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिरसा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष डी. बी. अंबुरे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राम चव्हाण आणि माजी सनदी अधिकारी संभाजीराव सरकुंडे उपस्थित होते. जिल्ह्यासह विविध भागांतील आदिवासी समाजबांधवांनी परिषदेला उपस्थिती लावली.
स्वतंत्र धार्मिक ओळखीच्या नोंदीवर भर
अध्यक्षीय भाषणात शिवाजीराव मोघे यांनी आदिवासी समाजाच्या स्वतंत्र धार्मिक ओळखीचा मुद्दा मांडला. ब्रिटिशकालीन जनगणनेत आदिवासी समाजासाठी वापरण्यात आलेल्या संज्ञांचा संदर्भ देत त्यांनी स्वातंत्र्यानंतरच्या जनगणनेतील धर्मवर्गीकरणामुळे स्वतंत्र धार्मिक ओळखीच्या नोंदीचा प्रश्न निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले.
आगामी जनगणनेत धर्माची माहिती नोंदविताना उपलब्ध ‘इतर’ पर्यायांतर्गत ‘आदिवासी धर्म’ अशी नोंद करण्यासाठी समाजबांधवांनी जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले. आदिवासी समाजाच्या धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांना शासकीय नोंदीत स्थान मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘आदिवासी’ संज्ञा आणि सांस्कृतिक परंपरांवर चर्चा
उद्घाटक दशरथ मडावी यांनी ‘आदिवासी’ आणि ‘वनवासी’ या संज्ञांच्या ऐतिहासिक व वैचारिक संदर्भांवर भाष्य केले. आदिवासी समाजाच्या स्वतंत्र परंपरा, संस्कृती आणि धार्मिक श्रद्धांचे जतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा उल्लेख करत शांततामय आणि वैचारिक मार्गाने जनजागृती करण्याचे आवाहन केले.
डी. बी. अंबुरे यांनी शासकीय दस्तऐवजांमधील नोंदींचे महत्त्व स्पष्ट केले. आदिवासी समाजाच्या धार्मिक ओळखीच्या नोंदीसाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे सांगतानाच विविध जमातींमध्ये सामाजिक व सांस्कृतिक एकात्मता वाढविण्यावर त्यांनी भर दिला.
आदिवासी नृत्याने वेधले लक्ष
परिषदेच्या निमित्ताने पहूर येथील आदिवासी महिलांनी लेझीमच्या तालावर पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. परिषदेदरम्यान ‘जय सेवा, जय बिरसा’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. आदिवासी समाजाच्या धार्मिक ओळखीबाबत व्यापक जनजागृती करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती, आयोजनासाठी परिश्रम
या परिषदेला गिरिजाताई उईके, नंदिनी टारपे, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. आरती फुफाटे, कार्तिका ठाकरे, सतीश पाचपुते, संतोष ठाकरे, विनोद भोकरे, नारायणराव कराळे, शकूराव कबले, डॉ. हरिभाऊ फुफाटे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश अंबुसकर, मच्छीमार संघाचे जिल्हाध्यक्ष कचरुबा भारस्कर, मत्स्यव्यवसाय विभागाचे उपायुक्त विक्रम कचवे आणि शेख एम. ए. नसीम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माजी जिल्हा परिषद सदस्या गोदावरी कोकाटे, बबन कुटे तसेच टिटवी, नांद्रा, गोत्रा, पहूर आणि मेहकर तालुक्यातील आदिवासी समाजबांधवांनी परिश्रम घेतले. गजानन तनपुरे, पोलीस पाटील दीपक तांबारे, श्याम तनपुरे, शेख खलील, नंदकिशोर कोकाटे, मारुती भिसे, डॉ. नामदेव डाखोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, सुभाष पाचपुते, नारायण जाधव, रतन कोकाटे, गजानन दराडे, राजेश टारपे, संतोष राऊत आणि सुनील खरात यांनी सहकार्य केले.




