लोणारच्या कमळजा माता मंदिरासाठी अखेर प्रशासनाची हालचाल!
आमदार सिद्धार्थ खरात यांची मध्यस्थी; चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता,

लोणार
ऐतिहासिक लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याखाली गेलेल्या कमळजा माता मंदिराचा प्रश्न अखेर ऐरणीवर आला आहे. मंदिर भाविकांसाठी खुले करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही ठोस कार्यवाही होत नसल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी बुधवारी संध्याकाळी उपोषणस्थळी भेट देत मध्यस्थी केली. महसूल, वन्यजीव आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर सरोवरातील पाणी यंत्राद्वारे उपसून अभयारण्य क्षेत्राबाहेर वळविण्यासंदर्भातील तांत्रिक प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलनाच्या चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता करण्यात आली.
जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे ऐतिहासिक कमळजा माता मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना देवीचे दर्शन घेता आले नाही. मंदिर भाविकांसाठी खुले करावे आणि पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, या मागणीने जोर धरला. प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आणि लोणार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाचे तीन दिवस उलटूनही ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी वाढली होती. दरम्यान शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असलेले आमदार सिद्धार्थ खरात यांनी बुधवारी संध्याकाळी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून प्रश्नाची माहिती घेतली. त्यानंतर महसूल, वन्यजीव आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत मंदिराचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रियेबाबत चर्चा केली. सरोवरातील पाण्याची पातळी, मंदिराचे संरक्षण, अभयारण्य क्षेत्राशी संबंधित नियम आणि पाणी उपसण्याच्या पर्यायांचा विचार करून पुढील कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
पाणी उपसण्याचा तांत्रिक प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकोला वन्यजीव विभागाच्या वतीने सरोवरातील खारे पाणी यंत्राद्वारे उपसून अभयारण्य क्षेत्राबाहेर वळविण्याचा तांत्रिक प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या प्रस्तावाला राज्य वन्यजीव मंडळाची शिफारस घेऊन राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे अंतिम कायदेशीर मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. अभयारण्य क्षेत्राशी संबंधित नियम आणि आवश्यक परवानग्यांनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मंजुरी मिळणे आणि प्रत्यक्ष काम सुरू होणे या पुढील महत्त्वाच्या बाबी असतील. त्यामुळे लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता झाली असली, तरी मंदिराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता आणि प्रत्यक्ष कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे.
शरबत देऊन उपोषण सोडविले
प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते शरबत देऊन उपोषणकर्ते जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राजेश मापारी, माजी नगराध्यक्ष साहेबराव पाटोळे, विकास मोरे, गोपी आखाडे आणि सुरेश वाठोरे यांचे उपोषण सोडविण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते श्याम उमाळकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते गजानन जाधव, बादशहा खान, गोपाल बचिरे, शहराध्यक्ष गजानन खरात तसेच माजी सभापती ज्ञानेश्वर चिभडे उपस्थित होते.
उपोषणाची सांगता झाली असली, तरी कमळजा माता मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होणार कधी, याकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे. पाणी उपसण्याच्या प्रस्तावाला आवश्यक मंजुरी मिळून प्रत्यक्ष उपाययोजना सुरू झाल्यानंतरच या प्रश्नावर ठोस मार्ग निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



