भाजप जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षास तत्काळ अटक करा – शिवसेना आक्रमक

बुलडाणा | प्रतिनिधी
पोलिसात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंद असून ही आरोपी वर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने बुलढाण्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय हरिभाऊ शिंदे व शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांच्यासह इतर आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी व नगरसेवकांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन मंगळवार २१ एप्रिल रोजी देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १८ एप्रिल २०२१ रोजी घडलेल्या घटनेत विजय हरिभाऊ शिंदे व इतरांनी श्रीकृष्ण आनंदा शिंदे यांना सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ही घटना समाजात तणाव निर्माण करणारी व अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणी फिर्यादीने तत्काळ बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. या कलमांनुसार गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ कारवाई अपेक्षित असताना ती होत नसल्याने शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोपींकडून अटकेस टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यासाठी १० जून २०२१ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, माननीय न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती तरीदेखील संबंधित आरोपींवर आजपर्यंत अटकेसारखी ठोस कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केला आहे की, या प्रकरणात विलंब होत असल्याने आरोपींचे मनोबल वाढत असून न्यायव्यवस्थेवर सामान्य नागरिकांचा विश्वास कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद असूनही कारवाई होत नसल्याने सामाजिक असंतोष वाढू शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, फिर्यादीने यापूर्वीही १८ मे २०१९ रोजी स्मरणपत्र देऊन आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. मात्र, त्या मागणीवरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने विलंब न करता कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या कडे दुर्लक्ष झाल्यास आता शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंह राजपूत, बुलढाणा नगरपालिका गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक जिजाताई राठोड, जिल्हा समन्वयक अनुजाताई सावळे, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई तायडे, विधानसभा समन्वयक पद्माताई परदेशी, शिवसेना विधानसभा समन्वयक गणेशसिंग राजपूत, शिवसेना शहरप्रमुख आशिष जाधव, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, नगरपालिका उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, महिला आघाडी शहरप्रमुख मयुरीताई देशपांडे, युवासेना महिला आघाडी शहरप्रमुख रामेश्वरीताई चव्हाण, महिला आघाडी कार्याध्यक्ष सौ. शुभांगी भोंडे, उपतालुका प्रमुख जयश्रीताई बोराडे, दुर्गाताई सरदार, नगरसेविका सौ. सपना अमित मावतवाल, महिला व बालकल्याण सभापती इंदुताई घट्टे, सौ. नीलमताई देवेंद्र खोत, देविताताई योगेश परसे, सौ. सरलाताई सुनील बरडे, सौ. वैशालीताई राहुल सुरडकर, इसरत परवीन मोहम्मद अझहर, सौ. देवांगना ताई अमित ठाकरे, सौ. मालती ताई आश्रुबा शेवाळे, सौ. पुष्पाताई शिवाजीराव धुड, सौ. सविता प्यारेलाल हडाले, तमिजा बी युनूस खान यांच्यासह नगरसेवक प्रशांत उत्तम जाधव, निसार खान इसाक खान, सतीश रामभाऊ बरडे, सचिन विलास गायकवाड, अशोक इंगळे, दीपक सोनुने, विजय जायभाये, नयनप्रकाश शर्मा, सुनील सपकाळ, मोहन पऱ्हाड, उदयदादा देशपांडे, विजय दुरणे, सरपंच डॉ. अनिस खान, योगेश परसे, सागर घट्टे, सुनील बरडे, अमित मावतवाल,आप्पा शिंदे, श्रीकृष्णा शिंदे, ज्ञानेश्वर खांडवे आदींसह शिवसेना व युवासेनेचे तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




