दिवाळीच्या गर्दीसाठी नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

बुलढाणा
दिवाळीच्या सणानिमित्त रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे (हडपसर) या प्रमुख मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यासंदर्भातील माहिती रेल्वेमंत्र्यांनी पत्राद्वारे दिली आहे.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने नियमित रेल्वे गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी जाधव यांनी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाने विविध मार्गांवर विशेष गाड्या आणि अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई मार्गावर आठ विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचे नियोजन असून, त्याशिवाय आणखी आठ अतिरिक्त फेऱ्या प्रस्तावित आहेत. नागपूर-पुणे (हडपसर) मार्गावर १७ विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, अतिरिक्त २४ फेऱ्यांचेही नियोजन सुरू आहे. यासोबतच शेगाव, नाशिक, अमरावती, विशाखापट्टणम, विजयवाडा आणि उधना या मार्गांवर १८ वि शेष रेल्वे गाड्या चालविण्याचे नियोजन आहे. तसेच आणखी १३ गाड्यांचे नियोजन करण्यात येत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.
दिवाळीच्या काळात प्रवाशांना आरक्षणासाठी होणारी धावपळ आणि गर्दीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत विशेष गाड्या व अतिरिक्त फेऱ्यांमुळे प्रवाशांना पर्यायी प्रवास सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. जाधव यांच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे मार्गावरील प्रवाशांना या निर्णयाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.




