नवदुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर धामणगाव बढे शहरात पोलिसांचा रूट मार्च
शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे शक्तिप्रदर्शन

| धामणगाव बढे
नवदुर्गा देवी विसर्जन मिरवणूक शांततेत, सुरक्षित व भयमुक्त वातावरणात पार पडावी, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने धामणगाव बढे पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी शहरात रूट मार्च काढण्यात आला. हा रुटमार्च सकाळी १०.३० वाजता काढण्यात आला.
या रूट मार्चमध्ये धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे एक अधिकारी, १८ पोलीस अंमलदार आणि २३ होमगार्ड अशा एकूण ४२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. शहरातील मिश्र वस्त्या, आगामी विसर्जन मिरवणुकीचा मार्ग, संवेदनशील ठिकाणे तसेच प्रमुख रस्त्यांवरून हा रूट मार्च काढण्यात आला. नवदुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील विविध भागांतून संचलन करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चच्या माध्यमातून देण्यात आला.
सण-उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सामाजिक सलोखा कायम राहावा आणि नागरिकांनी शांततेत उत्सव साजरा करावा, या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करावी, असे आवाहनही या अनुषंगाने करण्यात येत आहे.
नवदुर्गा देवी विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी धामणगाव बढे पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.




