महायुतीच्या कार्यक्रमात भाजपाच्या जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्याला डावलले
निमंत्रण पत्रिकेत जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचे नाव-छायाचित्र टाळल्याने नाराजी

बुलढाणा
सागवन येथे १४ ऑगस्ट रोजी दुपारी आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह स्थानिक पक्ष पदाधिकाऱ्यांना योग्य प्रतिनिधित्व न दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजप बुलढाणा तालुकाध्यक्ष सतीश भाकरे पाटील यांनी या प्रकाराची दखल घेतली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेतृत्वाकडे याबाबत लेखी तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सागवन येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांचा उद्घाटक म्हणून, तर आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांचा प्रमुख उपस्थित म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. मात्र भाजप बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांचेच नाव, छायाचित्र निमंत्रण पत्रिकेत नसल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. राज्यात महायुतीचे सरकार असताना महायुतीतील सर्व घटक पक्षांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये योग्य सन्मान व प्रतिनिधित्व मिळणे अपेक्षित असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष सतीश भाकरे पाटील यांनी म्हटले आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विकासकामांच्या कार्यक्रमात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याची भावना यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
कारणे स्पष्ट व्हायला पाहिजे – भाकरे पाटील
निवडणुकीच्या काळात महायुतीतील घटक पक्षांनी युतीधर्म पाळून एकमेकांना सहकार्य करायचे आणि निवडणुकीनंतर सार्वजन कार्यक्रम, विकासकामे व शासकीय उपक्रमांमध्ये भाजप कार्यकर्त्यांना योग्य सन्मान व प्रतिनिधित्व दिले जात नाही. याची कारणे स्पष्ट झाली पाहिजेत.
या संपूर्ण प्रकाराची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला लेखी स्वरूपात देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




