सालईबनच्या रानभाजी उत्सवात ‘स्वरविहार’ची सुरेल हजेरी

बुलढाणा
तरुणाई फाऊंडेशन, खामगाव यांच्या वतीने सालईबन येथे रविवारी (दि. १६ ऑगस्ट) पारंपरिक रानभाजी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला बुलढाणा येथील स्वरविहार संगीत विद्यालयाच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा आनंद घेतला.
पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व, ग्रामीण जीवनशैली, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवात रानभाज्यांची प्रदर्शनी, विविध पाककृती, वनभोजन तसेच निसर्गभ्रमण अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वरविहारच्या विद्यार्थ्यांनी व सदस्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात सांगीतिक सादरीकरण करत उत्सवात सुरांची रंगत वाढवली. संगीताच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा स्वरविहार संगीत विद्यालयाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असून, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये तरुणांचा सहभाग वाढणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रानभाजी उत्सवातील स्वरविहारच्या सहभागाचे तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक भाई मंजितसिंग यांनी कौतुक केले. लोकपरंपरा, निसर्ग आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ या उपक्रमातून अनुभवायला मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. रविकिरण मोरे यांच्यासह डॉ. मिलिंद जाधव, अॅड. अमोल देशपांडे, दिनकर डाबेराव, प्रसेनजीत मोरे, अनय डाबेराव, अनुज डाबेराव, समीर जाधव, सुमित जाधव, लताताई गुर्जर, शिल्पा डाबेराव, रत्नमाला जाधव, वैशाली मोरे, लक्ष्मी सुरोशे यांच्यासह स्वरविहारचे सदस्य सहभागी झाले होते.




