जखमी परप्रांतीयाला वैद्यकीय उपचारांसह, अन्न, कपड्यांची व्यवस्था; एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे कौतूक

खामगाव
चोर समजून अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पश्चिम बंगालमधील मालदा येथील ४५ वर्षीय अजित मंडल यांना ‘एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी वेळीच मदतीचा हात देत वैद्यकीय उपचार मिळवून दिले. एवढ्यावरच न थांबता उपचारादरम्यान त्यांच्या अन्न-पाण्याची तसेच कपड्यांचीही व्यवस्था करून दिली. या संवेदनशीलतेचे शहरवासियाकडून कौतुक केले जात आहे.
शहरातील बुलडाणा ते चिखली मार्गावर १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान अजित मंडल यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी चोर समजून जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ते बुलढाणा-चिखली बायपास मार्गावर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडले होते. १४ ऑगस्ट रोजी सकाळी या घटनेची माहिती सजनपुरी येथील एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते बबलू मानकर यांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील अजित मंडल यांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असल्याने त्यांनी त्यांना डॉ. गिरी यांच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी सुरज भैय्या यादव यांनी मंडल यांना महात्मा ज्योतिबा फुले सामान्य रुग्णालयात दाखल केले.
फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय उपचारांसोबतच अजित मंडल यांच्या चहा, नाश्ता, भोजन आणि कपड्यांची व्यवस्था स्वखर्चाने केली. परप्रांतीय नागरिकाला संकटाच्या काळात दिलेल्या या मदतीमुळे सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केल्या बददल परिसरात फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.
वेळेवर उपचार मिळाल्याने बचावले प्राण
महात्मा ज्योतिबा फुले सामान्य रुग्णालयात डॉ. शिंगाडे यांनी अजित मंडल यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचविण्यात यश आले. उपचारादरम्यान शुद्धीवर आल्यानंतर अजित मंडल यांनी आपली ओळख आणि पश्चिम बंगालमधील मालदा येथील पत्ता सांगितला. अज्ञात व्यक्तींनी आपल्याला चोर समजून अचानक मारहाण केल्याने आपण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळल्याचे त्यांनी सांगितले.
परप्रांतीय नागरिकासाठी माणुसकीची भिंत
रुग्णालयात उपचार सुरू असताना फाउंडेशनचे कार्यकर्ते बबलू मानकर, सुरज यादव, गणेश चावरे, हर्षल इंगळे आणि प्रदीप शमी यांनी अजित मंडल यांची आस्थेने काळजी घेतली. त्यांच्या नातेवाईकांची किंवा ओळखीच्या व्यक्तींची मदत उपलब्ध नसताना कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली. तसेच त्यांना नवीन कपडेही उपलब्ध करून दिले. जखमी व्यक्ती कोणत्या राज्यातील आहे, त्याची सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती काय आहे, याचा विचार न करता केवळ माणुसकीच्या भावनेतून मदतीसाठी पुढे येणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. संकटाच्या काळात एका अनोळखी परप्रांतीय नागरिकाला आधार देत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचा आदर्श निर्माण केला असून त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




