अभिनयाचे पंख लावून चिमुकल्यांनी स्वातंत्र्यदिनी नाट्यभरारी
बालनाट्य कार्यशाळेचा समारोप; ‘जनरेशन अल्फा’च्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेवर भाष्य

बुलढाणा
बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने बुलढाणा येथील मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने ५ ते १५ ऑगस्टदरम्यान बालनाट्य व कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध वयोगटातील बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यशाळेत डॉ. गिरीबाला प्रशांत सोनोने यांनी बालकांना अभिनय, आवाजातील चढ-उतार, संवादफेक तसेच रंगभूमीवर सादरीकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सोनोने यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, त्रिपुरा येथे नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतले आहे.
कार्यशाळेचा समारोप बालकांच्या कलाविष्काराने करण्यात आला. यावेळी ‘इंडिपेंडन्स इन पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ जनरेशन अल्फा’ या लघुनाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. आजच्या ‘जनरेशन अल्फा’च्या दृष्टीने स्वातंत्र्याची संकल्पना काय आहे, यावर या नाटिकेतून भाष्य करण्यात आले. बालकलाकारांनी सादर केलेल्या नाटिकेला उपस्थित पालक तसेच आजी-आजोबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यशाळेच्या माध्यमातून बालकांमधील अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन मिळून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. वैशाली गजेंद्र निकम यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व बालकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. गजेंद्र निकम, रविकिरण टाकळकर, मीनाक्षी सोनोने व मंगेश कुटे यांनी परिश्रम घेतले.



