चारवेळा उदघाटन होवून ही रस्त्याचे काम अपुर्णच, रखडलेली कामे सुरू करा; अन्यथा आमरण उपोषण
भाजप जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला सात दिवसांचा अल्टिमेटम

धामणगाव बढे | ( एस. बी. शेख)
परिसरातील मंजूर होऊनही रखडलेल्या रस्त्यांच्या कामांवरून नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. वारंवार उद्घाटन होऊनदेखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष गजानन सुखदेवराव घोंगडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे तातडीने कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. सदर मागणी सात दिवसात पूर्व करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनात घोंगडे यांनी आरोप केला आहे की, धामणगाव बढे येथील हिंदू स्मशानभूमी ते गोरनाळा या रस्त्याला मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याचे आतापर्यंत तीन ते चार वेळा उद्घाटन करण्यात आले असून, काही महिन्यांपूर्वी पुन्हा उद्घाटन झाले. मात्र, अद्याप प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालेले नसल्याचा आरोप घोंगडे यांनी केला आहे. काम रखडण्यामागे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, पिंपळगाव देवी रस्त्याची स्थितीही चिंताजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी धामणगाव बढे गावालगतचा सुमारे एक किलोमीटरचा भाग गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
सात दिवसांत काम सुरू करण्याची मागणी
दोन्ही रस्त्यांची कामे पुढील सात दिवसांत सुरू करण्यात यावीत, अशी मागणी घोंगडे यांनी केली आहे. या कालावधीत कामे सुरू न झाल्यास हिंदू स्मशानभूमी रस्त्यावरील गटारात आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. उपोषणाच्या काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीस सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, अमरावतीचे मुख्य अभियंता, बुलढाणा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांकडे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्रशासन या रस्त्यांच्या रखडलेल्या कामांबाबत कोणती कार्यवाही करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे




