बुलढाण्यात लवकरच होणार मिनी विमानतळ;आ. गायकवाड यांचा पुढाकार

प्लाय ओव्हर, रिंगरोड, महामार्ग, रेल्वे मार्ग विषयावर केंद्रीय मंत्री गडकरीशी चर्चा

 

बुलडाणा

जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजुभाऊ गायकवाड यांनी रविवारी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत बुलढाण्यासाठी प्रस्तावित मिनी विमानतळ लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे या मागणीसह महामार्ग, रेल्वेमार्ग, रिंग रोड आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांवर चर्चा केली.

भेटीदरम्यान आमदार गायकवाड यांनी बुलढाणा शहरासाठी प्रस्तावित मिनी विमानतळाला केंद्र शासनाची मंजुरी मिळावी आणि प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी केली. जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी, कृषी आणि पर्यटन विकासासाठी मिनी विमानतळ महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. याशिवाय बुलढाणा–मलकापूर–चिखली महामार्ग, बुलढाणा शहरासाठी रिंग रोड, बुलढाणा–बऱ्हाणपूर–मलकापूर नवीन रेल्वेमार्ग, राजूर घाटाचे दुहेरीकरण, ज्ञानगंगा अभयारण्यातील बोथा फॉरेस्ट परिसरात फ्लायओव्हर उभारणी तसेच प्रस्तावित बायपाससह विविध विकासकामांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्व प्रकल्पांना लवकर मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती आमदार गायकवाड यांनी केली.

 

मतदारसंघातील रस्ते, दळणवळण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांचाही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर पाठपुरावा केला. विकासकामांना गती मिळण्यासाठी केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडण्यात आलेल्या विविध प्रस्तावांचा संबंधित विभागामार्फत सकारात्मक विचार करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

 

या प्रसंगी नगरपालिका पाणीपुरवठा सभापती नयनप्रकाश शर्मा, नगरसेवक बबलू मावतवाल, नगरसेवक युनुस कुरेशी, कार्यकारी अभियंता श्री. काळे तसेच स्वीय सहाय्यक रोहित गवळी उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!