जिल्ह्यात १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, ५१ उपकेंद्रे सुरू होणार : प्रतापराव जाधव

प्रतिनिधी | बुलढाणा

केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री Prataprao Jadhav यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा करताना वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जिल्ह्यात लवकरच १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५१ नवीन उपकेंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. आरोग्य सेवा ही सर्वात मोठी सेवा असून ती पुण्याचे कार्य आहे, त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक भावनेतून काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बैठकीत जिल्ह्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांचा आढावा घेताना सध्या १ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालये, १४ ग्रामीण रुग्णालये, ५७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २८२ उपकेंद्रे कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. जन्मदर, बालमृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी राखण्यात जिल्ह्याने मिळवलेले यशही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत बोलताना मंत्री जाधव यांनी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे स्पष्ट करत दिवसातून दोन वेळा बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे निर्देश दिले. अपुरे मनुष्यबळ ही समस्या मान्य करत त्यांनी रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत, तसेच आवश्यक मनुष्यबळासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात डायलेसिस सेंटर आणि ब्लड बँक उभारण्याचे नियोजन करावे, सध्या उपलब्ध असलेल्या ८ डायलेसिस केंद्रांबरोबर ही सुविधा विस्तारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही, फायर ऑडिट आणि गॅस ऑडिट तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत, पोलीस स्टेशन असलेल्या गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित बांधकामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांना गती देण्यावर भर देत त्यांनी राष्ट्रीय अंधत्व कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक रुग्णांना मोफत चष्मे देणे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया वाढवणे, तसेच मानसिक आरोग्य तपासण्या वाढवण्याचे निर्देश दिले. टीबीमुक्त जिल्हा करण्यासाठी ‘निक्षय मित्र’ उपक्रमात अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा, असे सांगत १८०० रुग्णांपैकी केवळ ९०५ रुग्ण दत्तक घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महिलांच्या आरोग्याबाबत बोलताना एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती करण्याची गरज अधोरेखित करत ३० वर्षांवरील महिलांची ब्रेस्ट आणि सर्व्हायकल कॅन्सर तपासणी मोठ्या प्रमाणात राबवावी, असे निर्देश दिले. तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कार्डे मंजूर झाली असली तरी शेवटच्या गरजूपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी व्यापक मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील काही त्रुटींवरही बोट ठेवले. काही ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध नसताना कोविड काळातील साहित्य वापराविना पडून असल्याचे निदर्शनास आल्याने हे साहित्य तातडीने गरजू रुग्णालयांना उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांचा साठा ठेवणे आणि ‘जन औषधी’ केंद्रांतून रुग्णांना स्वस्त औषधे मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश दिले. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना किंवा इतर रुग्णांना विनाकारण रेफर न करता शासकीय रुग्णालयांतच उपचार करण्यावर भर देण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तर कामात कुचराई करणाऱ्यांच्या वेतनवाढीवर स्थगिती देण्याचे निर्देश देत त्यांनी प्रशासनाला सजग राहण्याचा इशारा दिला.

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी प्रास्ताविकात बुलढाणा जिल्हा आरोग्य क्षेत्रात राज्यात अग्रेसर असल्याचे नमूद करत विविध योजनांमध्ये मिळालेल्या यशाची माहिती दिली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!