फायर ऑडिटचा बोजवारा; लोणार पंचायत समितीत सुरक्षा रामभरोसे!

लोणार :
राज्य शासनाने सर्व सरकारी इमारतींचे ‘फायर ऑडिट’ (अग्निसुरक्षा तपासणी) बंधनकारक केले असतानाही, लोणार पंचायत समिती प्रशासनाने या नियमांकडे साफ दुर्लक्ष केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या या प्रशासकीय इमारतीचे अद्याप फायर ऑडिट झालेले नसून, आणीबाणीच्या प्रसंगी वापरासाठी आवश्यक असलेली प्राथमिक अग्निशमन यंत्रेसुद्धा येथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कर्मचारी व दररोज येणाऱ्या शेकडो नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
लोणार तालुक्यात गेल्या काही महिन्यांत आगीच्या गंभीर घटनांची मालिका घडली आहे. ग्रामीण रुग्णालयातील आगीत एका रुग्णाचा मृत्यू झाला होता, तर वढव परिसरात लागलेल्या आगीत ७ ते ८ घरांचे मोठे नुकसान झाले होते. अशा घटनांनंतरही पंचायत समिती प्रशासनाने कोणतीही ठोस खबरदारी न घेणे हे अत्यंत गंभीर मानले जात आहे.
दस्तऐवज आणि कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात
पंचायत समिती इमारतीत विजेच्या तारांचे जाळे असून अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटचा धोका निर्माण झाला आहे. याच इमारतीत तालुक्यातील ग्रामपंचायतींचे महत्त्वाचे दस्तऐवज, जलजीवन योजनेच्या फाईल्स व लाभार्थ्यांची कागदपत्रे ठेवलेली आहेत. अशा स्थितीत आग लागल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नियमांची सर्रास पायमल्ली
महाराष्ट्र आग प्रतिबंधक कायद्यानुसार सार्वजनिक इमारतींचे वर्षातून दोनदा फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे. मात्र, लोणार पंचायत समितीने या नियमांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. अगदी प्राथमिक अग्निशमन सिलेंडरही नसणे ही गंभीर प्रशासकीय अनास्था असल्याचे बोलले जात आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन
“तालुक्यात आगीच्या घटना वाढल्या आहेत. अशा स्थितीत पंचायत समितीने फायर ऑडिट न करणे गंभीर बाब आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडले जाईल.”
— शुभम बनमेरू, शहराध्यक्ष, भाजप
मागणी केली आहे, लवकर सुविधा मिळतील
गेल्या काही वर्षांपासून फायर ऑडिट झाले नव्हते. संबंधित विभागाशी पत्रव्यवहार सुरू केला असून लवकरच निधीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच अग्निशमन यंत्रेही लवकर बसवली जातील.”
— शरद घुगे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती लोणार




