जाचक बदली धोरण विरोधात परिचारिकांनी जिल्हयाभरात नोंदवला तीव्र निषेध
वित्तीय जवाबदारी नसतांनाही प्रशासकिय बदल्या का? परिचारिकांचा संताप उसळला

बुलडाणा,
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जाचक बदली धोरणाविरोधात जिल्ह्यातील परिचारिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. वित्तीय किंवा प्रशासकीय जवाबदारी नसतानाही परिचारिकांना प्रशासकीय बदल्यांच्या कक्षेत आणण्यात येत असल्याने जिल्हाभरातील विविध आरोग्य संस्थांमध्ये तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन गुरुवार २१ मे रोजी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय इमारती समोर करण्यात आले.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बदली धोरणाविरोधात जिल्हा नर्सेस एसोसिएशन बुलडाणा शाखाच्या नेतृत्वात परिचारिकांनी तीव्र आंदोलन छेडत शासनाच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला. रुग्णसेवेसाठी दिवस-रात्र झटणाऱ्या परिचारिकांवर अन्याय होत असून, प्रशासकीय बदल्यांच्या नावाखाली मानसिक छळ सुरू आहे, आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या कर्मचाऱ्यांवर विनाकारण प्रशासकीय बदलीची टांगती तलवार ठेवण्यात येत आहे. बहुतांश परिचारिका महिला असून अचानक होणाऱ्या बदल्यांमुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण तसेच वृद्ध पालकांची सेवा यावर गंभीर परिणाम होत आहे. ग्णसेवा करण्यासाठी मानसिक स्थैर्य आवश्यक असते; मात्र सततच्या बदल्याचे विषयामुळे कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत, असा आरोप परिचारिकांच्यावतीने करण्यात आला आहे. यावेळी हातात फलक घेऊन शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. तसेच यावेळी एसाेसिएशनच्यावतीने परिचारिकांच्या प्रशासकीय बदली प्रक्रिया कायमस्वरूपी रद्द करण्यात याव्यात, सध्याची प्रक्रिया स्थगित करण्यात यावी, व केवळ विनंती बदली मान्य करण्यात यावी आदी मागण्या देखील करण्यात आल्या.
या आंदोलनात राजमाता जिजाऊ वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय शेगाव, सिंदखेडराजा, वरवट बकाल, देऊळगाव राजा, लोणार आणि मोताळा येथील परिचारिका मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या.
उग्र आंदोलनाचा इशारा
जाचक बदली अटी तातडीने मागे घेतल्या नाहीत तर संघटनेच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, तसेच या धोरणामुळे भविष्यात रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष जयश्री वाघ, सरचिटणीस मंगेश शिरसाठ यांनी शासनाला दिला आहे.




