२०० संतप्त शेतकऱ्यांचा सब-स्टेशनवर धडक मोर्चा; अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

महावितरणचा भोंगळ कारभार उघड ; काकनवाड्यात ‘एजी’ लाईनचा खेळखंडोबा!

संग्रामपूर

तालुक्यातील काकनवाडा येथे महावितरणच्या निष्काळजी व बेजबाबदार कारभारामुळे शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट ओढवले आहे. कृषिपंपांसाठी असलेली ‘एजी’ विद्युत वाहिनी पूर्णपणे विस्कळीत झाल्याने संपूर्ण शेती सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्याची अत्यंत गरजेची वेळ असताना वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके करपण्याच्या मार्गावर असल्याने सुमारे २०० शेतकऱ्यांनी सब स्टेशनवर मोर्चा काढत अधिकाऱ्याला जाब विचारला. सदर आंदोलन १९ मे च्या रात्री करण्यात आले.
परिसरातील इतर कृषी वाहिन्यांचा वीज पुरवठा नियमित सुरू असताना केवळ काकनवाडा येथील एजी लाईन गेल्या महिनाभरापासून सतत बंद पडत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, आठवड्यातून केवळ दोन दिवस ते देखील अवघे चार तास वीज पुरवठा होत आहे. शासनाच्या नियमानुसार कृषिपंपांना दैनंदिन किमान आठ तास वीज मिळणे अपेक्षित असताना, महावितरणकडून शेतकऱ्यांच्या हक्काची उघड पायमल्ली होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. अपुऱ्या आणि कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी जळून खाक झाल्या असून, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड कोसळला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस तांत्रिक दुरुस्ती करण्यात आली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान या अडचणीला कंटाळून काकनवाडा येथील सुमारे २०० शेतकऱ्यांनी १९ मे रोजी रात्री वरवट बकाल येथील सब-स्टेशनवर धडक मोर्चा काढला. रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी सब-स्टेशनवर दाखल होताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी लावून धरली. मात्र, समस्येचे गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
रात्री उशिरापर्यंत शेतकरी सब-स्टेशनवर ठाण मांडून बसले होते, मात्र त्यांच्या पदरी कोणतेही ठोस आश्वासन पडले नाही. अधिकाऱ्यांच्या उद्धट आणि निष्क्रिय भूमिकेमुळे शेतकऱ्यांमधील संताप आणखी भडकला असून, प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचे २४ तासाचे अल्टीमेटम
दरम्यान, समस्त काकनवाडा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत २० मे रोजी महावितरणच्या वरवट बकाल उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांना आपल्या मागण्याचे लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार संग्रामपूर, उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद तसेच तामगाव पोलीस स्टेशन येथेही देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात काकनवाडा येथील एजी लाईनची तात्काळ तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, २४ तासांच्या आत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच नियमबाह्य चार तासांऐवजी हक्काची आठ तास वीज देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सदर मागणी २४ तासात पुर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!