केंद्र शासनाने दिली परवानगी; परराज्यातील व्यापारी ही करु शकणार खरेदी

केंद्राच्या इनाम योजनेत देऊळगावराजा बाजार समितीचा समावेश

देऊळगावमही
   देऊळगावराजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा केंद्र शासनाच्या ‘इनाम’ ( राष्ट्रीय कृषी बाजार) योजनेत समावेश करण्यात आला असून, यासाठी केंद्र शासनाने अधिकृत परवानगी दिली आहे. सदर परवानगीचे पत्र हे बाजार समितीला १७ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे आता देशातील इतर राज्यांतील व्यापाऱ्यांनाही देऊळगावराजा बाजार समितीतून थेट शेतमाल खरेदी करता येणार आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अधिक स्पर्धात्मक दर मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
        पारंपरिक बाजारव्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पारदर्शक, स्पर्धात्मक आणि शेतकरी-केंद्रित व्यवहार प्रणाली निर्माण करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.  देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीला केंद्र शासनाच्या इनाम या योजनेअंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल व्यासपीठाशी जोडले जात असून ई-लिलाव, ऑनलाइन नोंदणी, गुणवत्ता-आधारित दरनिर्धारण आणि त्वरित पेमेंट यांसारख्या सुविधा  लवकरच उपलब्ध  होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री प्रक्रियेत पारदर्शकता वाढून मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे,  तसेच एका राज्यातील व्यापाऱ्याला दुसऱ्या राज्यातील माल खरेदी करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.   यासह तांत्रिक सुविधा, इंटरनेट व्यवस्था, गुणवत्ता परीक्षण प्रयोगशाळा आणि कर्मचारी प्रशिक्षण या घटकांमुळे आधुनिक बाजार व्यवस्थेची पायाभरणी अधिक मजबूत होणार आहे. सोबतच  शेतमालाच्या दरांमध्ये स्पर्धात्मकता वाढून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला भाव मिळण्याचा मार्ग माेकळा  झाल्याने परिसरातील शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहता, राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होणे, त्वरित ऑनलाइन पेमेंट मिळणे, गुणवत्ता आधारित दर मिळणे आणि पारदर्शक लिलाव प्रक्रिया यांसारखे फायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य मूल्य मिळून उत्पन्नवाढीस चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देत शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
राष्ट्रीय बाजारपेठेचे  दार खुले; शेतकऱ्यांना मिळणार चांगल्या दराची संधी
केंद्र शासनाच्या ‘इनाम’ योजनेत देऊळगावराजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय बाजारपेठेचे दार खुले झाले आहे. या योजनेमुळे आता देशातील कोणत्याही राज्यातील व्यापाऱ्यांना देऊळगावराजा येथील शेतमाल खरेदी करता येणार असल्याने स्पर्धा वाढून मालाला अधिक चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासनिक पारदर्शकते मुळे संस्थेची विश्वासार्हता वाढली
देऊळगावराजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा केंद्र शासनाच्या ‘इनाम’ योजनेत समावेश होणे ही बाजार समितीच्या प्रशासनिक पारदर्शकतेची आणि कार्यक्षमतेची पोचपावती मानली जात आहे. बाजार समितीने गेल्या काही काळात शेतकरीहिताचे निर्णय, पारदर्शक लिलाव प्रक्रिया आणि नियमानुसार कामकाज यावर भर  दिल्यामुळेच केंद्र शासनाने या समितीची निवड केली आहे. या निर्णयामुळे बाजार समितीची विश्वासार्हता अधिक दृढ झाली असून, भविष्यात शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे संस्थेची विश्वासार्हता व आर्थिक उलाढाल देखील वाढणार असल्याची अपेक्षा  व्यक्त केली जात आहे.
बाजार समिती व्यापाराच्या मुख्य प्रवाहात सहभागी
केंद्र शासनाच्या इनाम योजनेत समावेश झाल्याने देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती डिजिटल कृषी व्यापाराच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शक व्यवहार व व्यापक बाजारपेठ यांच्या संगमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आता नवी दिशा मिळणार आहे.
समाधान शिंगणे, सभापती
कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगावराजा
0 0 00 0 0

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!