लोणारात २४ तास फक्त रांगाच !  डिझेल मिळत नसल्याने  बळीराजा हताश

 

लोणार

आंतरराष्ट्रीय युद्ध आणि विस्कळीत पुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईने आता भीषण रूप धारण केले आहे.  लोणार तालुक्यात भर  दुपारी,  मध्यरात्र, सकाळी पेट्रोल पंपांवरून गर्दी हटण्याचे नाव घेत नाहीये. डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आता २४-२४ तास पंपांवरच जागून काढावे लागत असून, या भयानक त्रासाला कंटाळून हताश झाल्याचे चित्र आहे.

शहरात यंदा भर दुपारी उन्हाचा पारा हा  ४2 अंश तापमानाच्या वर चालला आहे.  जेव्हा सामान्य माणूस घराबाहेर पडत नाही, तेव्हा लोणारमधील शेतकरी हातात प्लास्टिकचे कॅन घेऊन पंपांच्या कोरड्या रांगेत उभा आहे. डोक्यावर ऊन आणि पायाखाली तापलेला रस्ता, अशा परिस्थितीतही केवळ इंधन मिळेल या आशेने शेतकरी जागचा हलत नाहीये. टँकर कधी येईल याचा नेम नसल्याने शेतकरी रात्रीचे जेवण डब्यात घेऊन पंपावरच मुक्काम ठोकतायत. डासांचा डंख आणि अंधारातही पंपाच्या आवारात शेकडो शेतकरी डिझेलच्या प्रतीक्षेत जागून रात्र काढत आहेत.  रात्र संपून पहाट होताच रांगेचा वेढा आणखी १ ते २ किलोमीटर मागे जातो. दिवस उजाडताच पंपावर पाय ठेवायलाही जागा उरत नाही, इतकी तोबा गर्दी उसळत आहे.

शेतीची कामे ठप्प; बळीराजा धोक्यात

मान्सूनपूर्व मशागतीसाठी सध्या डिझेलची सर्वाधिक गरज आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा प्रचंड घटल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. डिझेलअभावी ट्रॅक्टर जागच्या जागी उभे असल्याने नांगरणी आणि कपाशी लागवडीची कामे खोळंबली आहेत. जर वेळेत पेरणी झाली नाही, तर यंदाचे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला दिवस-रात्र पंपावर रडवण्याऐवजी, शेतीसाठी डिझेलचा स्वतंत्र आणि सुरळीत कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 

तासनतास ताटकळलेल्या शेतकऱ्याला आले रडायला!

लोणारमधील एका पेट्रोल पंपावर कित्येक तास रांगेत उभा राहिलेल्या एका शेतकऱ्याचा संयम अखेर सुटला. रात्रीपासून दुपारपर्यंत उपाशीपोटी राहूनही जेव्हा डिझेल मिळाले नाही ,तेव्हा त्या हतबल शेतकऱ्याला भर पंपावरच ढसाढसा रडू कोसळले.अश्रू पुसत त्याने आपली व्यथा मांडली, “घरी ट्रॅक्टर उभा आहे, पेरणीची वेळ चालली आहे. सांगा साहेब, आम्ही जगायचं कसं आणि पेरणी करायची कशी?” या हताश शेतकऱ्याचा रडवेला टाहो ऐकून पंपावर उपस्थित असलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त झाला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!