बुलढाणा येथे नवनियुक्त मानद वन्यजीव रक्षकांचा सत्कार

बुलढाणा :
उपवनसंरक्षक कार्यालय, बुलढाणा येथे नवनियुक्त मानद वन्यजीव रक्षकांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत वन क्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे व स्वप्नील पवार (खामगाव) यांच्या हस्ते मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्त झालेल्या सचिन रामदास कापुरे (लोणार) तसेच डॉ. वैशाली गजेंद्र निकम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य बोथा, लोणार सरोवर, दुर्गा टेकडी, मढी जंगल (लोणार) तसेच अंबाबरवा अभयारण्य यांच्या जतन व संरक्षणासाठी लोकसहभाग वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
तसेच वृक्षतोड रोखणे, अवैध जंगलतोड व जंगलातील बेकायदेशीर कृत्यांविरोधात जनजागृती करणे, पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना सहभागी करून घेणे आणि वनविभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास जैवविविधता तज्ज्ञ आलोक शेवडे, निसर्ग फाउंडेशनचे सर्पमित्र विनय कुलकर्णी, वन्यजीव छायाचित्रकार डॉ. गजेंद्र निकम तसेच वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.




