बुलढाण्यात खाकी बेअब्रू; वैद्यकीय अहवालात मद्यप्राशन स्पष्ट, दोघांविरुद्ध गुन्हा

बंदीवानाला तपासणीसाठी नेणारेच पोलिस मद्यधुंद!

बुलढाणा 

ज्यांच्या ताब्यात बंदीवान सुरक्षित असावा, कायद्याची अंमलबजावणी शिस्तीत व्हावी, अशी अपेक्षा असते; तेच पोलिस कर्मचारी ड्युटीवर मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने बुलढाणा पोलिस दलाची गंभीर नामुष्की झाली आहे. जिल्हा कारागृहातील बंदीवानाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी मद्यप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुभाष शेळके आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रकाश मोरे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८५(१) अंतर्गत बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, ६ मे रोजी सकाळी जिल्हा कारागृहातील बंदी सचिन परशुराम माने याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पोलिस मुख्यालयातून सुभाष शेळके आणि प्रकाश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. सकाळी सुमारे ९.४० वाजता दोन्ही कर्मचारी बंदीवानासह रवाना झाले.
मात्र काही वेळातच जिल्हा कारागृह प्रशासनाने पोलिस विभागाला पाठविलेल्या लेखी पत्रात संबंधित पोलिस कर्मचारी आणि बंदी यांनी मद्यप्राशन केल्याचा संशय व्यक्त केला. कारागृह प्रशासनालाच थेट पोलिसांविरोधात तक्रार करावी लागल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत दोन्ही कर्मचाऱ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.
वैद्यकीय अहवालात दोघांनी मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासन हादरले. विशेष म्हणजे, एका बंदीवानाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना पोलिस कर्मचारीच नशेत असल्याचे समोर आल्याने पोलिस दलाच्या शिस्त, विश्वासार्हता आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या घटनेनंतर पोलिस विभागात तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधितांवर विभागीय चौकशीसह कठोर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकरण नेमके काय?
बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
बंदीवानाला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याची ड्युटी
दोन पोलिस कर्मचारी बंदीसह रवाना
कारागृह प्रशासनाला मद्यप्राशनाचा संशय
पोलिस विभागाला पाठविले लेखी पत्र
वैद्यकीय तपासणीत मद्यप्राशन स्पष्ट
दोघांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा

 

–सर्वाधिक गंभीर बाब…
बंदीवानाच्या सुरक्षेचा थेट प्रश्न
कारागृह प्रशासनालाच पोलिसांविरोधात तक्रार करावी लागली
ड्युटीवर मद्यप्राशनामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन
वरिष्ठांकडून कठोर कारवाईची शक्यता

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!