शिक्षकांना वेतनासाठी आंदोलन करावे म्हणजे शिक्षण व्यवस्थेच्या गळ्याला नख; प्रा. डी. एस. लहाने

बुलडाणा
पिढ्या घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या बौद्धिक श्रमाचे वेतन मिळविण्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असेल, तर हे शासनाचे मोठे अपयश आहे, नव्हे तर शिक्षण व्यवस्थेच्या गळ्याला नख लावल्या सारखे आहे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक प्रा. डी. एस. लहाने यांनी केली.
देऊळघाट येथे शिक्षकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी शाळेला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. सदर भेट नुकतेच पार पडली. शिक्षकांच्या अडचणी व समस्यावर चर्चा केल्यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी व्यवस्थेवर टिका करतांना पुढे ते म्हणाले की,
शिक्षक हा केवळ शासकीय कर्मचारी नसून समाजाच्या पुढील पिढ्या घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारा घटक आहे. अध्यापनासोबतच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही शिक्षकांवर सोपविली जाते. दिलेली अतिरिक्त कामेही शिक्षकांनी आजवर कोणतीही कुरकुर न करता वेळेत पूर्ण केली आहेत. मात्र, त्याच शिक्षकांना आपल्या हक्काच्या वेतनासाठी संघर्ष करावा लागत असल्याची परिस्थिती गंभीर असल्याचे प्रा. लहाने यांनी म्हटले.
अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा
शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे शाळा बंद होण्याचे प्रमाण, परीक्षा पद्धतीतील बदल आणि शिक्षणाच्या बजेटमध्ये होत असलेली कपात यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. शासनाच्या धोरणांमुळे शिक्षणव्यवस्थेवर आर्थिक व प्रशासकीय दबाव वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“शिक्षकांच्या वेतनासाठी संघर्षाची वेळ येणे ही केवळ शिक्षकांची समस्या नाही, तर भविष्यातील शिक्षण व्यवस्थेसमोरील गंभीर संकटाची नांदी आहे. शासनाचे सध्याचे धोरण शिक्षकांसाठी मरणाची घंटा, तर विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते,” असा घणाघात प्रा. लहाने यांनी केला.




