शिक्षकांचा सन्मान व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : प्रा. डी. एस. लहाने
शेगाव शिक्षक मेळाव्यात शिक्षकांच्या एकजुटीचे प्रभावी दर्शन

बुलडाणा
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही केवळ प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया नसून, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना आणि विविध अडचणींना व्यासपीठ मिळवून देणारी महत्त्वाची संधी आहे. बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेत शिक्षकांना अनेक पातळ्यांवर आव्हानांना सामोरे जावे लागत असून, शिक्षकांचा सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी भूमिका प्रा. डी. एस. लहाने यांनी मांडली.
ते शेगाव येथील शिक्षक मेळाव्यात बोलत होते. सदर मेळावा शेगाव येथील माऊली मंगल कार्यालयात नुकतेच उत्साहात पार पडला. शिक्षकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने प्रा. लहाने यांच्या पुढाकारातून विविध ठिकाणी शिक्षक मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पी. एन. कोल्हे होते. यावेळी सुधीर मानकर, गजानन काळे, प्रमोद येऊल, गजानन पैकट, गणेश सांगूनवेडे, मधुकर रौंदळे, सुधाकर देशमुख आणि प्राचार्य बकाल यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील शेकडो शिक्षकांनी मेळाव्यास उपस्थिती लावत विविध प्रश्नांवर आपली मते मांडली. त्यामुळे मेळाव्याला केवळ चर्चेचे स्वरूप न राहता शिक्षकांच्या संघटनात्मक एकतेचेही दर्शन घडले. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जवळ येत असताना आयोजित या मेळाव्याला विशेष राजकीय व संघटनात्मक महत्त्व प्राप्त झाले होते.
यावेळी प्रा. लहाने यांनी शिक्षण संस्था आणि शिक्षकांसमोरील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. नॉन-सॅलरी अनुदानाचा प्रश्न, भौतिक सुविधांसाठी येणाऱ्या अडचणी, संचमान्यतेचे निकष आणि शिक्षकांच्या पदांशी संबंधित प्रश्न यावर शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अनुदानाच्या अभावामुळे संस्थांच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाही व्यवस्थापनास अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. संचमान्यतेशी संबंधित नियम व निकषांचाही शिक्षकांच्या सेवाविषयक बाबींवर परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. शैक्षणिक क्षेत्रात स्थैर्य निर्माण करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षण संस्थांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर व्यावहारिक तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक मानकर यांनी केले. यावेळी पी. एन. कोल्हे यांनीही यावेळी आपले विचार मांडले. प्राचार्य विजय बकाल यांनी आभार मानले, तर संचालन शिक्षक संजय मिश्रा यांनी कार्यक्रमाचे केले.
शिक्षक प्रश्नांवर एकत्रित आवाजाची गरज
शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे स्वरूप वेगवेगळे असले तरी त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. सेवाविषयक प्रश्न, पदांची उपलब्धता, अनुदान, संचमान्यता, वेतन आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या मुद्द्यांवर शिक्षकांनी एकत्रितपणे भूमिका मांडल्यास त्याचा परिणामकारक पाठपुरावा करता येऊ शकतो, अशी भावना मेळाव्यात व्यक्त झाली. शिक्षकांच्या समस्या केवळ वैयक्तिक न राहता त्या शिक्षणव्यवस्थेशी संबंधित असल्याने त्याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शिक्षकांचा सन्मान ही शिक्षणव्यवस्थेची गरज
शिक्षक हा शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू असल्याने त्याला केवळ अध्यापनाची जबाबदारी देऊन थांबता कामा नये. त्याला योग्य सन्मान, सेवासुरक्षा आणि कामासाठी आवश्यक वातावरण मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यांचे प्रश्न वेळेत मार्गी लागले, तर त्याचा सकारात्मक परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवरही होऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान राखण्यासोबतच त्यांच्या व्यावसायिक अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी धोरणाची आवश्यकता आहे.
रोजगाराच्या संधींसाठी पात्रतेला न्याय मिळावा
उच्च शैक्षणिक पात्रता मिळवूनही अनेक तरुणांना त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा मेळाव्यात प्रकर्षाने मांडण्यात आला. विशेषतः उच्च पदव्या घेतलेल्या प्राध्यापकांना अत्यल्प मानधनावर काम करण्याची वेळ येणे ही चिंतेची बाब असल्याचे प्रा. लहाने यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्रात उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करून पात्र आणि गुणवंत तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.




