लोणारमध्ये स्कार्पिओची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास

 

लोणार

: कांदा बियाणे खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्याच्या स्कार्पिओ वाहनाची काच दगडाने फोडून अज्ञात चोरट्यांनी वाहनातील साडेतीन लाख रुपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास लोणार शहरातील लोणी रोडवरील चौकात घडली. या घटनेने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील तसेच सध्या केशव शिवणी येथे वास्तव्यास असलेले कांदा बियाणे व्यापारी दिलीप माधवराव खरले हे कांदा बियाणे खरेदी करण्यासाठी पांगरा डोळे येथे आले होते. त्यानंतर ते शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी नाक्याजवळील एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबले. त्यांनी आपली स्कार्पिओ गाडी (क्र. एमएच २८ सीसी ५७५४) लॉक करून हॉटेलमध्ये प्रवेश केला.

हीच संधी साधत अज्ञात चोरट्याने स्कार्पिओच्या चालकाच्या सीटच्या मागील बाजूची खिडकी दगडाने फोडली. वाहनाच्या आत ठेवलेली बॅग चोरट्याने बाहेर काढली. या बॅगेत सुमारे साडेतीन लाख रुपये रोख तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यानंतर चोरटा दुचाकीवरून आलेल्या साथीदारासह घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घोगरे, लेखनिक गणेश लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे, गजानन डोईफोडे व चालक हरिभाऊ ढाकणे यांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच चोरट्यांच्या शोधासाठी विविध मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली. मात्र, तोपर्यंत आरोपी दुचाकीवरून लोणी रोडच्या दिशेने पसार झाले होते.

या प्रकरणी दिलीप खरले यांच्या तक्रारीवरून लोणार पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३४० अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३२४(२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनाली गर्जे करीत आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!