आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी केली भाविकांची चरण व मोफत आरोग्यसेवा

 

शेगाव
भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा त्रिवेणी संगम असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात श्री संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालय, गायगाव बु. यांच्या वतीने कनारखेड फाट्यावर पालखीतील भाविकांसाठी चरणसेवा व मोफत आरोग्यसेवेचा उपक्रम राबविण्यात आला. खामगाव ते शेगाव या पायी वारीत सहभागी झालेल्या हजारो भक्तांच्या थकलेल्या पायांना आयुर्वेदिक तेलाने सेवा देत महाविद्यालयाने मानवसेवेचा आदर्श घडविला.
व्हिजन एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटी, बुलडाणा संचालित या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीपक लद्दड, सचिव डॉ. संगीता लद्दड, उपाध्यक्ष रवींद्र लद्दड आणि कोषाध्यक्ष अर्चना लद्दड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रणाम खर्चे यांच्या नियोजनातून हा सेवाभावी उपक्रम यशस्वीपणे पार पडला. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक भाविक खामगाव ते शेगाव हा पायी प्रवास करतात. दीर्घ पायी प्रवासामुळे पायांवर येणारा ताण, थकवा व वेदना लक्षात घेऊन आयुर्वेदिक तेलाने भाविकांच्या पायांची चरणसेवा करण्यात आली. या सेवेमुळे थकलेल्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. अनेक भक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. चरणसेवेबरोबरच आरोग्यसेवा केंद्रावर गरजू भक्तांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि आयुर्वेदिक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. पालखी मार्गावर उभारण्यात आलेल्या या सेवा केंद्रामुळे प्रवासादरम्यान आरोग्यविषयक त्रास जाणवणाऱ्या भक्तांना तातडीने मार्गदर्शन व उपचार मिळाले.
ज्ञानातून आरोग्य, आयुर्वेदातून उपचार व सेवेतून समाधान’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालखीतील भाविकांनी कौतुक केले. श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात भक्तांच्या चरणांची सेवा आणि आरोग्यसेवा करण्याच्या माध्यमातून आयुर्वेद महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत ‘सेवेची वारी’ प्रत्यक्षात साकारली.

विद्यार्थ्यांमध्येही रुजला सेवाभाव
या सेवाकार्यात महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पराग जगताप आणि डॉ. श्रद्धा पद्मने यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. तसेच रुग्णालय व महाविद्यालयातील कर्मचारी रवीराज ढगे, युवराज ढगे, चंद्रमणी सोनोने यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. भाविकांची प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांच्या मनात रुग्णसेवा, मानवता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची मूल्ये अधिक दृढ झाली. वैद्यकीय शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष समाजसेवेशी जोडले गेले पाहिजे, याचे प्रभावी उदाहरण या उपक्रमातून पाहायला मिळाले.

मोफत आरोग्य तपासणीसह औषधोपचार
पालखी मार्गावरील सेवा केंद्रात गरजू भक्तांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार व आयुर्वेदिक आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. पायी प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या किरकोळ आरोग्यविषयक तक्रारींवर मार्गदर्शन मिळाल्याने अनेक भक्तांना या आरोग्यसेवेचा लाभ झाला. वैद्यकीय सेवेबरोबरच सेवाभावाची जोड या उपक्रमातून दिसून आली.

000

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!