तुकाराम मुंडे आले रे रे रे …
डोणगावात दहा मिनीटात बाजारपेठ झाली बंद

डाेणगाव
डोणगावात आज दुपारी अन्न व औषध प्रशासन विभागचे आयुक्त आयपीएस तुकाराम मुंडे आले रे रे रे … अशी चर्चा पसरली अनं संपुर्ण बाजारपेठ केवळ १० मिनीटात बंद झाली. कार्यवाहीच्या धसक्याने अख्खी बाजारपेठ क्षणात सुनसान झाल्याचे दिसून आले. ही घटना १५ जून रोजी दुपारी घडली.
अन्न व औषध प्रशासन विभागचे आयुक्त आयपीएस तुकाराम मुंडे यांच्या नावाची दहशत राज्यासह आता जिल्हयात ही निर्माण झाली आहे. नुकतेच शेगाव येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेट देवून तेथील कचेरीचे सॅम्पल घेतल्याने व्यापाऱ्याचे धाबे दणाणले आहे. त्या पाठोपाठ रविवारी या विभागाच्या विशेष पथकाने सुमारे ५० लाख रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. यामुळे गुटखा व्यापाऱ्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान सोमवारी डोणगावतील सोशल मीडियावर ‘आयुक्त मुंडे आले अशी अफवा पसरली. हा एक मेसेज वाऱ्यासारखा पसरला. या केवळ एका मेसेजमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि काही मिनिटांतच संपूर्ण बाजारपेठ बंद झाली.
तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडेही वळवला आहे. या धडक कारवाईचा धसका घेत अनेक छोटे-मोठे व्यावसायिक, हॉटेल चालक, तसेच किराणा आणि मिठाईच्या दुकानदारांनीही आपली दुकाने बंद करून पळ काढण्यातच धन्यता मानली. विशेषतः भेसळ करणारे आणि अवैध मार्गाने व्यवसाय करणारे व्यापारी आता चांगलेच धास्तावले असून, साहेबांच्या कारवाईच्या भीतीने त्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवण्यास पसंती दिली आहे.


