लोणारच्या पाणीपुरवठा योजनेच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह
८४ किमीऐवजी ४४ किमी पाइपलाइनचे टेंडर काढल्याचा आरोप; ५० टक्के शहर पाण्यापासून वंचित राहण्याची भीती

लोणार
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या लोणार शहराच्या प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजनेच्या सर्वेक्षणावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमृत २.० अभियानांतर्गत शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे १५० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत चुकीचे सर्वेक्षण व अपुरे नियोजन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रस्तावित योजनेत शहरातील मोठ्या भागाला पाइपलाइनच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणार नसल्याने सुमारे ५० टक्के नागरिकांवर भविष्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी क्रांतिगुरु लहुजी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव दशरथ पाटोळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. योजनेचे सर्वेक्षण, आराखडा व अंदाजपत्रक तयार करताना संबंधित प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था (PMC) तसेच नगरपालिका प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
८४ किमीची गरज असताना ४४ किमीचेच टेंडर
तक्रारीनुसार, लोणार शहरातील वाढता विस्तार लक्षात घेता संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ८४ किलोमीटरची मुख्य वितरण पाइपलाइन आवश्यक असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रस्तावित योजनेत केवळ ४४ किलोमीटर पाइपलाइनचेच टेंडर काढण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
यामुळे शहरातील उर्वरित भाग पाणीपुरवठ्याच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शासनाचा मोठा निधी खर्च करूनही शहरातील सर्व नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार नसेल, तर योजनेच्या नियोजनावर फेरविचार करण्याची गरज असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अधिकाऱ्यांनी आराखड्याची पडताळणी केली का?
लोणार शहरातील नागरिकांना दरडोई १६५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १४ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पाणी वितरण व्यवस्थेला मंजुरी देण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. मात्र, योजना राबविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या आराखड्याची आणि अंदाजपत्रकाची संबंधित अधिकाऱ्यांनी पुरेशी पडताळणी केली का, असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.
चुकीच्या सर्वेक्षणामुळे योजनेच्या मूळ उद्देशालाच बाधा येत असल्याचा आरोप करत, आराखड्याची तांत्रिक तपासणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
पाणीपुरवठा योजनेच्या सर्वेक्षणात आणि नियोजनात दोष आढळल्यास त्यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साहेबराव पाटोळे यांनी केली आहे. तसेच संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होईल, अशा पद्धतीने योजनेचा आराखडा सुधारावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योजनेत आवश्यक सुधारणा केली नाही, तर लोणार शहरात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा क्रांतिगुरु लहुजी विचार मंचाने दिला आहे. आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस नगरविकास विभाग आणि स्थानिक प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीच्या प्रती बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, अमरावतीचे विभागीय आयुक्त तसेच बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडेही सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.



