१२ ऑक्टोबरपासून राजेश मापारींसह चौघांचे आमरण उपोषण
नवरात्रात कमळजा माता मंदिर खुले करा

लोणार
जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवरातील ऐतिहासिक कमळजा माता मंदिर नवरात्रोत्सवात भाविकांसाठी खुले करण्यात यावे, या मागणीने आता आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे. मंदिराकडे जाणारा मार्ग सरोवरातील पाण्यामुळे बंद असल्याने लाखो भाविकांना देवीच्या दर्शनापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश श्रीराम मापारी यांच्यासह चौघांनी १२ ऑक्टोबरपासून लोणार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
लोणार सरोवरात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कमळजा माता मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. नवरात्रोत्सवात दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र, यंदा मंदिरापर्यंत पोहोचण्याचा मार्गच बंद असल्याने भाविकांच्या दर्शनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरोवरातील पाणी काढून मंदिर भाविकांसाठी सुरक्षितपणे खुले करण्यात यावे, या मागणीसाठी २४ जानेवारी २०२६ रोजीही शासन व संबंधित विभागांकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप राजेश मापारी यांनी केला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता लोणार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा अनुचित घटना घडल्यास महसूल विभाग, वन्यजीव विभाग आणि पुरातत्व विभाग जबाबदार राहतील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
या निवेदनावर राजेश श्रीराम मापारी, साहेबराव दशरथ पाटोळे (माजी नगरसेवक), सुरेश समाधान वाठोरे (उपाध्यक्ष, तालुका काँग्रेस) आणि विकास मधुकर मोरे (शहराध्यक्ष, युवक काँग्रेस) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव, अमरावतीचे विभागीय आयुक्त, बुलढाणा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक तसेच लोणार तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.



