प्रा.लहाने यांच्या विजयासाठी शिक्षकांना साकडे; आ.सिद्धार्थ खरात यांचा मेहकर परिसरात झंझावाती दौरा

मेहकर:
अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पूर्ण रंगात आली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रा. डी. एस. लहाने यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीने ताकद पणाला लावली आहे. याच पार्श्वभूमीवर मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षकांशी थेट संवाद साधला.
आपल्या दौऱ्यादरम्यान आमदार खरात यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. विनाअनुदानित शाळांचा प्रश्न, जुनी पेन्शन योजना, आणि शिक्षकांच्या सेवाविषयक समस्या यांवर भाष्य करताना ते म्हणाले, “प्रा. डी. एस. लहाने हे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व खंबीर नेतृत्व आहे. शिक्षकांचे विधान परिषदेतील प्रश्न पोटतिडकीने मांडण्याची आणि ते तडीस नेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. प्रा. लहाने हेच शिक्षकांच्या सर्व समस्या सोडवतील,” असा ठाम आशावाद आमदारांनी यावेळी व्यक्त केला.
या भेटीदरम्यान विविध शाळांमधील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आमदारांचे स्वागत केले. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा. लहाने यांच्या पहिल्या पसंतीच्या मतदानाचे आवाहन करत मतदारसंघातील सर्व शिक्षकांनी लहाने सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रचार दौऱ्यामुळे मेहकर तालुक्यातील शिक्षण वर्तुळात प्रा. डी. एस. लहाने यांच्या उमेदवारीला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.



