संजय गायकवाड व बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : माकप

मुंबई | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बददल बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांनी व बागेश्वर बाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या दोघांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे की काय? हे सामान्य जनतेला कळेना झाले. त्यामुळे फडणवीस सरकारने तत्काळ या दोघांच्या बददल आपले मत स्पष्ट करावे अशी मागणी माकपच्यावतीने करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे संपादक प्रशांत अंबी यांना अत्यंत वाईटरित्या शिवीगाळ केली आहे व धमक्या दिल्या आहेत. माता भगिनी वरून त्यांनी वापरलेली भाषा कोणत्याही सभ्य माणसाला सहन होणार नाही अशी आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांच्या उपस्थिती मध्ये कथा वाचक बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे थकले होते व त्यांनी आपला राजमुकुट आणि राजसत्ता रामदास स्वामी यांच्यासमोर ठेवली होती, असे इतिहासाच्या तथ्यांची तोडमोड करून छत्रपतींबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. या दाेघांच्या कृतीचे, मौन बाळगत समर्थन करायचे हा दुटप्पीपणा सोडण्याची आवश्यकता आहे. सरकार या दोन्ही विषयाचे समर्थन करत आहेत काय ? असा प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उपस्थित केला असून याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.




