गुरुपौर्णिमेनिमित्त ललित कथ्थक नृत्य अकादमीचा रंगला नृत्याविष्कार

बुलडणा
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळांतर्गत कार्यरत ललित कथ्थक नृत्य अकादमीच्या वतीने टिळक नाट्य क्रीडा मंदिर येथे शास्त्रीय नृत्याविष्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. गुरु-शिष्य परंपरेचा जागर घडविणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विविध नृत्यप्रकारांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी टिळक नाट्य क्रीडा मंदिराचे सचिव ॲड. तुषार महाजन, बालरोगतज्ज्ञ डॉ. अक्षय हिरे, डॉ. कृतिका हिरे, उद्योजक राजेश देशलहरा, केंद्र व्यवस्थापक काशिनाथ तायडे तसेच संगीत क्षेत्रातील अरविंद टाकळकर, मकरंद सराफ, लक्ष्मण चुकेवार, निलेश गव्हाळे, उषा चिंचोळकर आणि राजेश आडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा नृत्यगुरू छाया हरीष तायडे यांनी सांभाळली.
कार्यक्रमाची सुरुवात अकादमीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गुरुवंदनेने झाली. त्यानंतर कथ्थक, मराठी लावणी, राजस्थानी लोकनृत्य तसेच विविध सांस्कृतिक नृत्यप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी कु. क्षितिजा देशपांडे, नुपूर तायडे, श्रेयशी देशमुख, रसिका चिंचोळकर, दिव्या चौधरी आणि ऋतुजा देशपांडे यांनी सादर केलेल्या मराठी लावणीने विशेष दाद मिळविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भगवान गरुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नयन इंगळे यांनी मानले. कार्यक्रमास पालक, कला रसिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0




