शेगाव ते पंढरपूर पालखीमार्ग ९ वर्षापासून रखडलेलाच
मुदत संपली तरीही कामे अर्धवटच, अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारास पूर्णत्वाचे प्रमाणपत्र
प्रतिनिधी | मेहकर
शेगाव ते पंढरपूर या वारकरी भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या पालखीमार्गाचे काम गेल्या नऊ वर्षांपासून ठप्प असून, वारंवार मुदतवाढ देऊनही रस्त्याचे काम आजतागायत पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे, प्रत्यक्षात कामे अर्धवट असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदारास काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
शेगाव ते पंढरपूर या पालखी महामार्गाच्या ३६ किलोमीटर अंतराच्या सिमेंट रस्त्याची दुरुस्ती व शहरातील गट्टू, स्ट्रीट लाईट व शहरातील अर्धवट असलेल्या नाल्याचे काम यु बी एन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड परतुर या कंपनीला ७ फेब्रुवारी २०२५ मध्ये देण्यात आले होते. सदर अर्धवट काम पुर्ण करण्यासाठी कंपनीला सहा महिन्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत 6 ऑगष्ट २०२५ रोजी संपली आहे. असे असले तरीही या मार्गावरील अर्धवट कामे अजूनही पुर्णत्वास गेले नाही. यामध्ये शहरातील स्ट्रीट लाईट, रस्त्याच्या कडेला गट्टू, अर्धवट नाल्या यांचे काम अजूनही सुरू झालेले नाही. ठेकेदाराची कामाची मुदत संपून ६ महीने होऊन देखील काम झाले नाही.
अधिकाऱ्याने दिले पुर्णत्वाचे प्रमाणपत्र
२०१७ मध्ये पालखी मार्गाचे काम सुरू झाले होते. हे काम सुनील हायटेक लिमिटेड या कंपनीने घेतलेले होते. काम अतिशय निष्कृष्ट होत असल्याच्या अनेक तक्रारी होत होत्या, परंतु तत्कालीन एमएसआरडीसी चे अधिकारी यांनी या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. मेहेकर – सुलतानपूर हा रस्ता अक्षरशा कागदासारखा फाटला आहे, हे उघड्या डोळ्यांनी सामान्य नागरिकांना दिसत होते. रस्त्यावर निर्माण झालेल्या या फटीमुळे अनेक अपघात होऊन कायमस्वरूपी अपंगत्व व अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तरीसुद्धा एम.एस.आर.डी. सी च्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला वेळोवेळी मुदतवाढ दिली, परंतु देखभाल दुरुस्ती करून घेतली नाही व संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देऊन सगळे पैसे अदा करून दिले. त्यानंतर १७ मे २०२२ रोजी सदर अधिकाऱ्याने हे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सुनील हायटेक प्र.लिमिटेड या कंपनीने दिले.
नविन कंत्राट काढून ही काम रखडलेलेच
रस्त्या कामाचे बील अदा केल्यावर सदर सुनील हायटेक कंपनीने पुढील एक वर्ष रस्त्याची देखभाल करावे असे कंत्राट नियमात होते. त्या अनुशंगाने सदर कंत्राटदाराची अनामत रक्कम सात कोटी ३९ लाख रुपये एम.एस.आर.डी.सी. कडे ठेवण्यात आली होती. वारंवार संपर्क करुन देखील सदर कंपनी देखभाल करण्यास उत्सुक नसल्याचे दिसून आल्याने संबंधित विभागाने कंपनीची अनामत रक्कम सात कोटी ३९ लाख रुपये जप्त करुन नव्याने कंत्राट काढले. यात मेहेकर -अजीजपूर रस्त्याची देखभाल, दुरुस्ती, स्ट्रीट लाईट, नाल्या व गट्टू अशा प्रकारचे नवीन टेंडर काढून नवीन सुरुवात करण्यात आली. परंतु ज्या कंपनीने हे काम घेतले त्याने मुदत संपवल्यावर ही काम पुर्णत्वास नेले नसल्याने नागरिकात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
नियम धाब्यावर ठेवून देण्यात आले कंत्राट
शासनाच्या नियमानुसार कोट्यावधी रुपयाचा टेंडर घेण्यापूर्वी संबंधित कंपनीची आर्थिक परिस्थिती पाहल्या जाते. त्यानंतरच संबंधित कंपनीला कंत्राट दिल्या जातो. हे पाहण्याचे कारण म्हणजे शासनाकडून बिलाची दिरंगाई झाल्यास काम बंद राहू नये या करीता कंपनीची आर्थिक परिस्थिती(बीड कॅपॅसिटी ) पाहल्या जाते व नंतरच कंपनीला कंत्राट दिल्या जातो. परंतु यु बी एन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ची बीड कॅपॅसिटी न पाहताच अधिकाऱ्यांनी आर्थिक देवान घेवान करुन कंपनीला कंत्राट देण्यात आल्याची चर्चा नागरिकात होत आहे.
अधिकाऱ्याचा उर्मटपणा, माहिती देण्यास टाळाटाळ
या संदर्भात माहिती घेण्यासाठी कार्यकारी अभियंता सतीश आकोडे यांच्याशी ३ फेब्रुवारी रोजी संपर्क केला असता त्यांनी उर्मटपणे उत्तर देत माहिती देण्यास नकार दिला व वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलण्याचा सल्ला दिला. तसेच माहिती हवी असल्यास लेखी द्या मी माहिती देतो असे कार्यकारी अभियंता सतीश वाकोडे यांनी सांगितले.




