नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

 मुंबई,

 राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.

 दमणगंगा–वैतरणा–गोदावरी नदीजोड प्रकल्प, दमणगंगा–एकदरे– गोदावरी नदीजोड प्रकल्प तसेच कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा नदी खोऱ्यात वळविण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृह येथे नदीजोड प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जलसंपदा सचिव संजय बेलसरे, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोकणातील जलसमृद्ध खोऱ्यांमधील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नाशिक व मराठवाडा भागातील पाणीटंचाई दूर करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील अतिरिक्त जमिनी पर्यावरणपूरक व पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून महामंडळाचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात येणार आहेत. धरण क्षेत्रालगतच्या या जमिनी सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकसित व व्यवस्थापित करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्यांत  कार्यवाही सुरू झाली असून या धोरणानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

‘नाबार्ड’च्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या सिंचन प्रकल्पांसाठी 24 हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित असून त्यापैकी साडेआठ हजार कोटी रुपये जलसंपदा विभागास प्राप्त झाले आहेत. या निधीतून विविध सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचे वितरण करण्याबाबत वित्त व नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे तसेच कृष्णा खोऱ्यातून भीमा खोऱ्यात पाणी आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

फ्लोटिंग सोलर पॉवर जनरेशन पॉलिसीचा आढावा

जलसंपदा विभागाने तयार केलेल्या फ्लोटिंग सोलर पॉवर जनरेशन पॉलिसीच्या आराखड्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर करण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री विखे- पाटील यांनी दिले.

तसेच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत पाटबंधारे नियम, १९७६ मध्ये प्रस्तावित बदल करण्याबाबतच्या तरतुदी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असून, त्यासंदर्भातही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध सिंचन प्रकल्प, विकासकामे तसेच नदीजोड प्रकल्पांसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती सादर करण्यात आली.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!