संग्रामपूर तालुक्यातील सर्व कृषी फिडरवर सिंगल फेज सुरु करा
नागरिकांच्यावतीने करण्यात आली मागणी, महावितरणला निवेदन

प्रतिनिधी | संग्रामपूर
तालुक्यातील कृषी फीडरवर अद्याप सिंगल फेज वीजपुरवठा होत नाही. अशा सर्व कृषी फिडरवर तात्काळ रात्रीच्या वेळेत सिंगल फेज वीज सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, संग्रामपूर तालुका हा आदिवासीबहुल व पूर्णतः कृषीप्रधान असल्याने येथील बहुतांश शेतकरी शेतीवर अवलंबून असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र सध्या तालुक्यातील अनेक गावांमधील कृषी फिडरवर रात्रीच्या वेळेत सिंगल फेज वीजपुरवठा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही मोजक्या गावांमध्ये सिंगल फेज वीज सुरू असताना बहुसंख्य गावांमध्ये ही सुविधा अद्याप न मिळणे हे अन्यायकारक व भेदभावपूर्ण असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे.गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील शेतशिवारात रानडुक्कर, रोयटे तसेच बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणावर वाढला असून रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. दिवसभर शेतीचे कष्ट करूनही रात्री पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना शेतातच मुक्काम करावा लागत असून, सिंगल फेज वीज नसल्यामुळे ही परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. रात्रीच्या वेळेत सिंगल फेज वीजपुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकरी प्रकाश व्यवस्थेच्या मदतीने पिकांचे संरक्षण करू शकतील, वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान टाळता येईल आणि शेतकऱ्यांच्या जीवितास सुरक्षितता मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तालुक्यातील ज्या-ज्या कृषी फिडरवर सध्या सिंगल फेज वीजपुरवठा नाही, त्या सर्व फिडरवर तात्काळ रात्री सिंगल फेज वीज सुरू करण्याचा तातडीचा निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायास संबंधित विभाग जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांच्यासह पंजाबराव ठाकरे, अझहर अली, विवेक राऊत, भगवान पाखरे, राजेंद्र धर्माधिकारी, महेश घाटे, स्वप्निल देशमुख, आकाश पालीवाल, श्याम देशमुख, शेख अब्दुल, सुनील अस्वार, सतीश जवंजाळ यांच्या सह्या आहेत.
लवकरच नवीन वीज उपकेंद्र होणार
मागण्यांबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी विषय वरिष्ठ पातळीवर मांडण्यात येणार आहे. तसेच येत्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत संग्रामपूर तालुक्यात नवीन वीज उपकेंद्र (सबस्टेशन) सुरू केले जाणार आहे. कृषी फिडरवरील सिंगल फेज वीजपुरवठ्याची समस्या लवकरच दूर होईल.
– आशिष गणगणे,उपकार्यकारी अभियंता,महावितरण, संग्रामपूर




