प्रा. डॉ. नीता बोचे यांना ‘उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ राज्यस्तरीय पुरस्कार

अमरावती | प्रतिनिधी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे नुकतेच आव्हान–२०२५ (चान्सलर ब्रिगेड) राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील गों.से. महाविद्यालयात कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नीता भानुदास बोचे यांना ‘उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय आव्हान शिबिराच्या समारोप कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ. नीता बोचे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबिरात त्यांनी बुलढाणा जिल्हा संघ व्यवस्थापिका म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
या सन्मानाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रा. डॉ. नीता बोचे म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची व प्रेरणादायी बाब आहे. या यशाच्या क्षणी ज्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा, प्रेम, विश्वास आणि साथ दिली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आपले प्रोत्साहन, प्रेरणा व मिळालेले पाठबळ हीच माझ्या वाटचालीची खरी ताकद आहे. हा सन्मान केवळ माझा नसून आपणा सर्वांचा आहे.”
प्रा. डॉ. नीता बोचे या विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोबडे, उपाध्यक्ष तांबट, सचिव डॉ. प्रशांत बोबडे, कोषाध्यक्ष अजिंक्य बोबडे, तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर आणि बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डॉ. एच. ए. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले कार्य प्रभावीपणे केले.
प्रा. डॉ. नीता बोचे यांना मिळालेल्या या मानाच्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल शैक्षणिक, सामाजिक व स्वयंसेवी क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



