वाहनातून पडून वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

खामगाव
खामगाव – शेगाव मार्गावरील लासुरा फाट्याजवळ शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात वारकरी संप्रदायातील एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भक्तीभावाने निघालेला वारकरी प्रवास क्षणातच अपघातात संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) पहाटे सुमारे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जनार्दन दगडू गाडेकर (वय ६५, रा. सावळा, ता. व जि. बुलडाणा) हे एका दिंडीत सहभागी होऊन प्रवास करीत होते. दिंडीदरम्यान ते ट्रॅक्टरमध्ये बसून जात असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात गाडेकर गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे दिंडीतील वारकरी, नातेवाईक तसेच परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईकांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




