स्पर्धा परीक्षेत सातत्य, शिस्त महत्वाची; अधिकाऱ्यांचा स्पर्धा परीक्षा शिबीरात मार्गदर्शन

अमरावती,
राज्य आणि केंद्र स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. या अभ्यासासाठी पुस्तके आणि माहितीचे स्त्रोत विचारपूर्वक निवडणे गरजेचे आहे. तसेच स्पर्धा परीक्षेतील यशासाठी सातत्य आणि शिस्त महत्वाची असल्याचे मत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरात व्यक्त केले.
जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यात भारतीय पोलिस सेवेतील सागर भामरे आणि भारतीय वन सेवेतील प्रांजल चोपडे यांनी मार्गदर्शन केले. . भामरे यांनी अखिल भारतीय सेवेतील परीक्षा उत्तीर्ण होण्यात ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व स्तरातील विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करताना पर्यायी मार्गही शोधणे आवश्यक आहे. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी निश्चित कालावधी आहे. त्यामुळे परीक्षा देण्याआधी पूर्ण अभ्यासक्रम जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी परीक्षेच्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला अभ्यासक्रम आणि मागील वर्षीच्या पेपरमधील प्रश्नावली महत्वाचे आहेत. तसेच पर्यायी विषय निवडताना अभ्यासक्रमाची उपलब्धता आणि मार्गदर्शन महत्वाचे आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपली वैयक्तिकरित्या आपली बलस्थाने आणि कमजोरी लक्षात घेऊन तयारी करावी. यासोबतच चालू घडामोडीसाठी वृत्तपत्र आणि मासिकांचा आधार घेणे आवश्यक आहे. चोपडे यांनी पर्यायी विषय निवडताना काळजीपूर्वक निवडावे. आवश्यकता भासल्यास विषय बदलवावा. परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी दररोज सात ते आठ तास अभ्यास करणे आवश्यक आहे. यातही दर्जेदार अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासोबतच मॉक टेस्टला समोर जाणे आवश्यक आहे. यामुळे परीक्षा पद्धती समजून घेण्यास मदत होईल. परीक्षांमध्ये लेखनाचा सराव होणे आवश्यक आहे. यात गतीने प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी संयमीही आवश्यक आहे. अपयशाच्या कालावधीत मार्गदर्शक आणि मदत करणारे मित्र आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.




