मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार
मुंबई
“४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेत विराजमान होणार असून येणाऱ्या काळात मुंबई शहराला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याच्या हेतूने, मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या, तसेच शहराची सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून मुंबईच्या महापौर कार्यरत असतील. महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल, असे सांगत महापालिकेत शंख फुंकत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम महापालिका भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला.
महायुतीच्यावतीने महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी मुंबई महापालिका भाजप पक्ष कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासह महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे, भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार मनोज कोटक, गटनेते गणेश खणकर, भाजप सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्वेता परुळकर आदी उपस्थित होते.
मुंबईकरांचं जीवन सुकर करणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर आणि उपमहापौर हे कार्य करतील,असे स्पष्ट केले.
उबाठा आणि मनसे यांच्याकडून उमेदवारीची शक्यता असल्याने याचं आव्हान वाटतं का या प्रश्नावर उत्तर देताना साटम म्हणाले की, “सर्वांनाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं स्वातंत्र्य असते. त्यामुळे ज्यांना अर्ज दाखल करायचे आहेत ते सर्वच उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात. पण भाजपा आणि शिवसेना यांचे ११८ नगरसेवक आणि नगरसेविका आहेत आणि त्या ११८ व्यतिरिक्त आणखी काही नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेलं आहे.”



