सीएसआर उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाली हरित ऊर्जा
हरित उर्जेसाठी स्टेट बॅकेचा प्रयत्न; जि. प. हायस्कुलला ५ सोलर पॅनल भेट

प्रतिनिधी | बुलडाणा,
तालुक्यातील धाड येथील भारतीय स्टेट बँक, धाड शाखेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून तालुक्यतील म्हसला बु. येथील जिल्हा परिषद हायस्कूल, या शाळेला ५ केव्हीए क्षमतेचे सोलर पॅनल भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेतील दीर्घकाळापासून जाणवणाऱ्या वीज समस्येवर दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना गती मिळणार आहे. सदर कार्यक्रम नुकतेच पार पडला.
वाढती ऊर्जा गरज आणि पर्यावरणावरील ताण लक्षात घेता हरित ऊर्जेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सौर, पवन व जैवऊर्जा यांसारख्या नवीकरणीय ऊर्जास्रोतांमुळे प्रदूषण कमी होते तसेच पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व घटते. हरित ऊर्जेचा वापर केल्यास कार्बन उत्सर्जनात घट होऊन हवामान बदलाचा धोका कमी करण्यास मदत होते.
शैक्षणिक संस्थांमध्ये हरित ऊर्जेचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे प्रत्यक्ष उदाहरण पाहता येते. वीज बचत, खर्चात कपात व दीर्घकालीन शाश्वतता हे त्याचे मुख्य फायदे आहेत. सौर ऊर्जेसारखे पर्याय ग्रामीण भागासाठी अधिक उपयुक्त ठरतात. त्यामुळे शिक्षणासोबतच पर्यावरणाबाबत जागरूक आणि जबाबदार पिढी घडविण्यास हरित ऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावते. या पार्श्वभूमिवर धाड येथील स्टेट बँक शाखेच्यावतीने सदर शाळेच सोलर पॅनल भेट म्हणून देण्यात आले. या सोलर पॅनलमुळे वीजपुरवठ्यातील अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होणार आहेत. वीज खंडित झाल्यासही शालेय अध्यापन, संगणक कक्ष व इतर शैक्षणिक उपक्रम सुरळीत सुरू राहणार आहेत. डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांना नियमित वीज उपलब्ध होणार असल्याने अध्यापन अधिक प्रभावी ठरणार आहे.
दरम्यान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक नीरज कुमार होते. यावेळी धाड शाखा व्यवस्थापक आनंद कडू, भगवानराव भोंडे, रामदास भोंडे, पोलीस पाटील रामेश्वर पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना क्षेत्रीय व्यवस्थापकांनी सीएसआर उपक्रमांतर्गत शिक्षण, पर्यावरण संरक्षण व सामाजिक विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगितले. सोलर ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणपूरक दृष्टीकोन रुजण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये नवी जाणीव निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच शाखा व्यवस्थापकांनी बँकेच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचलन कैलास लहासे यांनी केले. अाभार विजय भोंडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापक एन. ए. काळे यांच्या हस्ते क्षेत्रीय व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. शाळेला सोलर पॅनल उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक नंदाराम काळे यांनी भारतीय स्टेट बँकेचे आभार मानले. या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल होऊन विद्यार्थ्यांना आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक सुविधांचा लाभ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सीएसआरमधून शिक्षणाला बळ
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत भारतीय स्टेट बँक शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण व सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबविते. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्यावर बँकेचा विशेष भर असून, सोलर पॅनलसारख्या शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हरित ऊर्जेच्या वापरामुळे शाळेची बचत
या उर्जेच्या वापरामुळे शाळेच्या वीज खर्चात बचत होऊन ती रक्कम शैक्षणिक सुविधांवर खर्च करता येणार आहे. यासोबतच पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना पाहता येणार असल्याने हरित ऊर्जेबाबत जागृती निर्माण होईल. दीर्घकालीन आणि शाश्वत उपाय म्हणून हा उपक्रम शाळेच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना शिक्षक व पालकांनी व्यक्त केली आहे.
00




