रशियात व्हॉट्सॲपवर बंदी

मॉस्को | वृत्तसंस्था
रशियात लोकप्रिय असलेल्या WhatsApp या मेसेजिंग अॅपवर बंदीची शक्यता निर्माण झाली असून, रशियन सरकारच्या ताज्या हालचालींमुळे लाखो वापरकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशांतर्गत डिजिटल सुरक्षा आणि डेटा नियंत्रण मजबूत करण्याच्या उद्देशाने सरकार विदेशी अॅप्सवर निर्बंध आणण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाने यापूर्वीच WhatsApp ची मूळ कंपनी असलेल्या Meta Platforms ला 2022 मध्ये “अतिरेकी संघटना” घोषित केले होते. त्यानंतर Facebook आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, WhatsApp ही मुख्यतः संदेशवहन सेवा असल्याने त्याला तेव्हा बंदीपासून वगळण्यात आले होते. मात्र, आता रशियन प्रशासन स्वतःचे देशांतर्गत मेसेजिंग प्लॅटफॉर्म विकसित करण्यावर भर देत असून, नागरिकांनी स्थानिक अॅप्सचा वापर करावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव विदेशी अॅप्समुळे नागरिकांचा वैयक्तिक डेटा परदेशात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते, WhatsApp वर तात्काळ बंदी घालण्यात आलेली नसली तरी भविष्यात निर्बंध लादण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रशियातील नागरिक पर्यायी अॅप्सकडे वळण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, WhatsApp हे रशियात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप असून, बंदी लागू झाल्यास दैनंदिन संवादावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




