१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती झाल्याने घटना उघड

चिखली
तालुक्यातील शेलूद परिसरात १२ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय युवकाविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलगी ही मूळ रानअत्री येथील रहिवासी असून सध्या ती आपल्या कुटुंबासह शेलूद येथे वास्तव्यास आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिचे आई-वडील रोजमजुरी करून उदरनिर्वाह करतात. १५ जून २०२५ रोजी आई-वडील मजुरीसाठी बाहेर गेले असताना आरोपी सागर शेषराव सुरडकर वय २२, रा. डोगर खंडाळा याने घरात एकटी असलेल्या मुलीवर अत्याचार केला, अशी तक्रार आहे. त्यानंतर आरोपीने पीडितेला धमकावून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. भीतीमुळे आणि कमी वयामुळे पीडितेने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. दरम्यान, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पीडित मुलीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने तिच्या आईने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आईने विचारणा केली असता मुलीने आरोपीकडून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. यानंतर पीडितेच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम ६४ (२) आणि ६५ (२) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) २०१२ अंतर्गत कलम ६, १० व १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.




