संग्रामपूरला ‘सेशन कोर्ट’ची हाक; न्यायासाठी नागरिकांचा एकमुखी आग्रह
संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचा एल्गार; ‘सेशन कोर्ट’ स्थापन करा

संग्रामपूर
संग्रामपूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय (सेशन कोर्ट) स्थापन करण्यात यावे, अशी जनहिताची मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर निवेदन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय बुलढाणा यांना मा. तहसीलदार, संग्रामपूर यांच्या मार्फत सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संग्रामपूर तालुक्यासाठी नव्या न्यायालयीन इमारतीचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर असून लवकरच ती पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. मात्र, तालुक्यातील सत्र प्रकरणे (Session Cases) मोठ्या प्रमाणात खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित आहेत. परिणामी, संग्रामपूर तालुक्यातील फिर्यादी, आरोपी, साक्षीदार तसेच वकील वर्ग यांना प्रत्येक तारखेला खामगाव येथे जावे लागत असून वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
विशेष म्हणजे, खामगाव न्यायालयात प्रलंबित असलेल्या सत्र प्रकरणांपैकी लक्षणीय संख्या ही संग्रामपूर तालुक्यातील प्रकरणांची असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. वारंवारच्या प्रवासामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागत असून न्यायप्रक्रिया अधिक खर्चिक व क्लिष्ट ठरत आहे.
संग्रामपूर येथे न्यायालयीन इमारत पूर्णत्वास येत असताना येथेच अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, न्यायदान प्रक्रिया अधिक सुलभ, जलद व परिणामकारक होईल तसेच खामगाव न्यायालयावरील प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी होण्यास मदत होईल, असेही तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संग्रामपूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्याबाबत आवश्यक प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवून मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जनहित, न्यायसुलभता आणि प्रशासनिक कार्यक्षमतेच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत रास्त व आवश्यक असल्याचे सांगत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा तालुका पत्रकार संघाने व्यक्त केली आहे.
निवेदन सादर करताना तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांच्यासह रामेश्वर गायकी, डॉ. संतोष लांडे, श्याम देशमुख, पंजाबराव ठाकरे, अजहर अली, स्वप्निल देशमुख, राजेंद्र धर्माधिकारी, शेख अब्दुलभाई, विवेक राऊत, मनोज अमनकार, श्याम इंगळे, मोहन सोनोने, सुनील अस्वार व नंदू खानझोड आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
मागणी योग्यच
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाने केलेली मागणी अतिशय योग्य असून या मागणीला वकील संघाचा पाठिंबा आहे.
– अॕड. गणेश क्षीरसागर, माजी अध्यक्ष वकील संघ संग्रामपूर



