भरदिवसा शिक्षक कॉलनीत घरफोडी; ८५ हजारांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी | बुलडाणा
शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील निर्मिती अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील समता नगरपाठीमागे असलेल्या निर्मिती अपार्टमेंट येथील रहिवासी उमेश हरीभाऊ शहाणे वय ३९ हे कुटुंबासह वास्तव्यास असून त्यांचा शिलाई मशीन विक्रीचा व्यवसाय आहे. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी २.१५ ते ४.४५ या वेळेत शहाणे कुटुंबातील सर्व सदस्य बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर उचकटून चोरट्यांनी दीड तोळे वजनाची सोन्याची पोत किंमत ५० हजार रुपये, गजानन महाराजांचे सोन्याचे लॉकेट किंमत ५ हजार रुपये, सोन्याचे कानातील फुले किंमत १० हजार रुपये, सोन्याची बास्केट रिंग किंमत ५ हजार रुपये, चांदीचे कडे किंमत २ हजार रुपये तसेच १३ हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सायंकाळी शहाणे कुटुंबीय घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले व घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, ठाणेदार रवी राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चापाईतकर आणि पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक पथकालाही तपासासाठी पाचारण करण्यात आले.
याप्रकरणी उमेश शहाणे यांच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
0


