हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी | नांदुरा
तालुक्यातील निमगाव येथे लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांत २९ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील चांगलवाडी येथील रहिवासी रामदास भगवान डवले यांची मुलगी भारती विशाल पाऊलझगडे वय २९ हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी निमगाव येथील विशाल पाऊलझगडे याच्याशी झाला होता. विवाहानंतर सुरुवातीला काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्यानंतर पती विशाल तसेच सासरच्या मंडळींकडून भारतीचा छळ सुरू झाल्याचा आरोप आहे. माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत तिच्यावर वारंवार दबाव टाकण्यात येत होता. ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्याने तिला टोमणे मारणे, अपमान करणे तसेच शारीरिक व मानसिक त्रास देणे असे प्रकार सुरू होते. हा छळ ८ ऑगस्ट २०२१ पासून १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरूच होता. या सततच्या जाचाला कंटाळून भारतीने आत्महत्या केली, असा आरोप भारतीचे वडील रामदास डवले यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी नांदुरा पोलिसात आरोपी पती विशाल पाऊलझगडे, सासरे रामदास पाऊलझगडे, सासू रत्नप्रभा पाऊलझगडे, दीर वैभव पाऊलझगडे, नणंद अनिता जयसिंगपुरे, सुनिता मनसुटे व श्रद्धा पाचपोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
00




