आई-वडिलांच्या चरणीच सर्व तीर्थांचे सार; भक्तीला मध्यस्थ नको – नागेश महाराज आगलावे

शिवपुराण कथा सप्ताहात मातापित्यांच्या सेवेचे महत्त्व पटवून दिले

प्रतिनिधी | संग्रामपूर
तालुक्यातील पातुर्डा येथे सुरू असलेल्या शिवतीर्थावरील शिवपुराण कथा सप्ताहात सहाव्या पुष्पाचे गुंफण करताना हरिभक्त परायण नागेश महाराज आगलावे यांनी आई-वडिलांच्या सेवेचे व निस्सीम भक्तीचे महत्त्व प्रभावी शब्दांत विशद केले. ईश्वर व भक्त यांच्या मध्ये कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून मनोभावे केलेली भक्ती भगवंताला सहज प्राप्त करून देते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पातुर्डा येथील शिवतीर्थावर महाशिवरात्री निमित्त प्रारंभ करण्यात आलेल्या शिवपुराण कथा सप्ताह प्रारंभ करण्यता आला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. यंदा परिसरातील भाविकांच्या मागणीनुसार सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान भाविकांना मार्गदर्शन करतांना आगलावे महाराज म्हणाले की, भगवंत सर्वत्र राहू शकत नसल्याने त्याने आई-वडील निर्माण केले असून त्यांच्या चरणीच सर्व तीर्थांचे सार सामावलेले आहे, असे सांगत महाराजांनी विविध पौराणिक दृष्टांत मांडले. भगवान गणेश यांनी पृथ्वी प्रदक्षिणे ऐवजी आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून अग्रपूजेचा मान मिळविला, हे उदाहरण देत मातापित्यांच्या स्थानाची महती त्यांनी अधोरेखित केली. तसेच भक्त पुंडलिकाच्या कथेतून आई-वडिलांच्या सेवेमुळे साक्षात पांडुरंगालाही विटेवर थांबावे लागले, असा उल्लेख करत “भक्ती प्रामाणिक असेल तर भगवंतालाच भक्ताकडे यावे लागते,” असे ते म्हणाले.
“स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” या ओवीतून आईच्या प्रेमाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. एक आई चार मुलांना वाढवते; मात्र चार मुलांना एका आईची सेवा करता येते का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी कुटुंब व्यवस्थेतील बदलांवर चिंतन व्यक्त केले. भारतीय संस्कृतीतील मूल्य, इतिहास आणि पौराणिक परंपरा जाणून घेतल्यास समाजातील ही परिस्थिती बदलू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भगवान कार्तिकेय यांच्या कथेद्वारेही त्यांनी मातापित्यांप्रती असलेल्या प्रेमाचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले. विविध दृष्टांतांनी भारावलेल्या या प्रवचनामुळे उपस्थित श्रोत्यांमध्ये काही काळ भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

अलोट गर्दी; व्यवस्थेत वाढ
शिवपुराण कथा सप्ताहातील सहाव्या पुष्पासाठी खेड्यापाड्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. वाढत्या गर्दीमुळे व्यवस्था दोन वेळा वाढवावी लागली. उद्या महाशिवरात्री असल्याने भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.

भाविकांचा तन-मन-धनाने सहभाग
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी तन-मन-धनाने सहभाग नोंदवला असून गेल्या दोन दिवसांत प्रसाद व्यवस्थेसाठी आवश्यक निधी छोट्या देणग्यांमधून उभारण्यात आला. उद्याच्या कार्यक्रमासाठी मुबलक प्रमाणात उसळ तयार करण्याचे साहित्य उपलब्ध झाल्याची माहिती समितीने दिली. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावला असून विविध भागांतून भाविकांचा ओघ सुरू आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!